बेळगाव

Belgaum seed availability: मागणी ३७,५४३ क्विंटल; उपलब्ध ३०,४४२

जिल्ह्यातील बियाणांची स्थिती : कृषी खात्याकडून १७४ बियाणे वितरण केंद्रे स्थापन

पुढारी वृत्तसेवा

​बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी कृषी खात्याने पूर्वतयारी सुरु केली आहे. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सभा, थेट संवाद आणि विविध तालुक्यांमध्ये बियाणे वितरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पिकांसाठी मिळून एकूण बियाणांची मागणी ३७,५४३ क्विंटल असून सद्यस्थितीत गोदामांमध्ये ३०,४४२ क्विंटल बियाणे साठा उपलब्ध आहे.

कृषी अधिकारी सध्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पेरणीच्या पद्धती, जमिनीतील ओलावा, बियाणांचा दर्जा आणि पावसाचा अंदाज याविषयी मार्गदर्शन करत आहेत. मात्र, अद्याप जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे शेतकरी पेरणीसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चालू खरीप हंगामात सोयाबीन, मूग, तूर आणि उडीद ही बेळगाव जिल्‍ह्यात मुख्य पिके आहेत. पुरेसा पाऊस आणि जमिनीत योग्य ओलावा निर्माण झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे. यामुळे पिकांची उगवण चांगली होईल आणि पिके सुदृढ राहतील.

बदलत्या हवामानामुळे आणि अनिश्चित पावसामुळे या हंगामात चिंतेचे वातावरण आहे, त्यामुळे, शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान आणि जमिनीतील ओलावा पाहूनच सावधगिरीने पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

​बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तब्बल १७४ बियाणे वितरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. २०२६-२७ च्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाची लागवड सर्वाधिक क्षेत्रावर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वितरण केंद्रांवर आवश्यक बियाणांचा साठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील 'रयत संपर्क केंद्रा'ला भेट देऊन बियाणे मिळवावे. पुढील दोन दिवसांत केंद्रांवर आणखी बियाणे उपलब्ध करुन दिले जाईल, असे कृषी खात्याचे उपसंचालक एच. डी. कोळेकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT