खानापूर : गेल्या महिन्याभरापासून अचानक वाळू उपसा व वाहतूक बंद झाल्याने वाळूच्या तालुक्यातच कुणी वाळू देता का, असे विचारण्याची वेळ आली आहे. सरकारी विकास योजनांच्या कामांचा धडाका आणि विविध गावांच्या यात्रांच्या पार्श्वभूमीवर वाळूची मोठ्या प्रमाणात गरज असताना निर्माण झालेल्या टंचाईमुळे बांधकाम क्षेत्रासह वाळू व्यावसायिक आणि मजुरांचे हाल होत आहेत.
खानापूर तालुक्याचे अर्थकारण वाळू आणि वीट व्यवसायावर अवलंबून आहे. जंगल भागात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असल्याने शेती संकटात आली आहे. परिणामी प्रत्येक गावात वाळूचा व्यवसाय करणारे व्यवसायिक वाढले आहेत. शेतीला पूरक जोडधंदा असल्याने शेकडो तरुणांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे. काहीजण अति हव्यासामुळे बोटी आणि यंत्रांचा वापर करून वाळू उपसा करतात. त्याचा परिणाम नदी आणि नाल्यांच्या प्रदूषणात होत आहे. अशा ठिकाणी जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या अशा मोजक्या वाळू व्यावसायिकांमुळे सरसकट सर्वच वाळू व्यावसायिकांना फटका बसला आहे.
अनेक तरुणांनी कर्ज काढून वाळू वाहतुकीसाठी टेम्पो, ट्रक यासारखी वाहने खरेदी केली आहेत. बँक व पतसंस्थांचे हप्ते थकल्याने बेरोजगारी बरोबरच त्यांना कर्जाचीही चिंता सतावत आहे. हलशी, हलशीवाडी या ठिकाणी 27 वर्षांनंतर ग्रामदेवता लक्ष्मीदेवीच्या यात्रोत्सवामुळे जुन्या घरांची दुरुस्ती तसेच नव्या घरांच्या उभारणीची शेकडो कामे सुरु आहेत. दोन महिन्यांवर यात्रा येऊन ठेपली आहे. बांधकामासाठी वाळू मिळत नसल्याने पंचाईत झाली आहे.
राबणाऱ्या हातांना मिळेना काम
पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत वाळू व्यवसाय केला जातो. यामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर वाळू व्यावसायिक त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षभराची बेगमी करतात. गेल्या महिनाभरापासून वाळू व्यवसाय बंद झाल्याने जांबोटी क्रॉस, रुमेवाडी क्रॉस आणि पारिश्वाड क्रॉस या ठिकाणी वाळू व्यावसायिकांना कामाविना दिवसभर रिकामी बसून घरी जावे लागत आहे. पोलिस आणि प्रशासनाने वाळू समस्येवर त्वरित तोडगा काढावा अन्यथा वाळू मजुरांच्या कुटुंबियांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वाळू कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद सुतार यांनी दिला आहे.