बेळगाव : नैर्ऋत्य रेल्वेच्या लोंढा यार्डातील महत्त्वाच्या तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामांमुळे बेळगाव मार्गावरील काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार २५ ते २८ जुलै दरम्यान या बदलांचा फटका प्रवाशांना बसणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मिरज-लोंढा डेली पॅसेंजर (क्र. ५६९३१) ही गाडी २४ ते २७ जुलै दरम्यान बेळगाव ते लोंढा दरम्यान अंशतः रद्द राहील. ही गाडी लोंढ्याऐवजी बेळगाव स्थानकावरच आपली यात्रा समाप्त करेल. लोंढा-मिरज डेली पॅसेंजर (क्र. ५६९३२) २५ ते २८ जुलै दरम्यान लोंढा ते बेळगाव दरम्यान धावणार नाही. ही गाडी बेळगाव स्थानकावरुन आपल्या नियोजित वेळेत मिरजेकडे रवाना होईल.
मिरज-कॅसलरॉक डेली एक्सप्रेस (क्र. १७३३३) ही गाडी बेळगाव ते कॅसलरॉक दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. ही गाडी कॅसलरॉकऐवजी बेळगाव स्थानकातच थांबेल. कॅसलरॉक-मिरज डेली एक्सप्रेस (क्र. १७३३४) ही गाडी कॅसलरॉक ते बेळगाव दरम्यान रद्द राहील. ही गाडी कॅसलरॉक ऐवजी बेळगाव स्थानकावरुन नियोजित वेळेनुसार सुटेल. या तांत्रिक कामांमुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-बंगळूर द्वैसाप्ताहिक एक्सप्रेस (क्र. १६५५४) २२ जुलै रोजी सुमारे ४० मिनिटे उशिराने धावणार आहे. तसेच केएसआर बंगळूर-बेळगाव एक्स्प्रेस (क्र. २९६५३) २६ जुलै रोजी ३० मिनिटे आणि २७ जुलै रोजी ६० मिनिटे उशिराने धावणार आहे. लोंढा यार्डातील अभियांत्रिकी कामे पूर्ण होईपर्यंत हा बदल असेल. प्रवाशांनी रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.