बेळगाव : आधी आपल्या ओळखीच्या लोकांना ३० ते १०० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम जमल्यानंतर ती मोजण्याच्या बहाण्याने स्वतःच पूर्वनियोजन करून दरोडा टाकत तब्बल २ कोटी ६८ लाख रुपयांची रक्कम लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी म्होरक्यासह नऊ जणांना पोलिसांनी अटक केली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये मुख्य संशयित चिदानंद सिद्धारूढ कुरबेट्टी (रा. संगनगकेरी, ता. मुडलगी), याच्यासह संजीव रामाप्पा अरभावी ( तुक्कानट्टी, ता. मुडलगी), राजाराम सुरेश माळ्यागोळ, रमेश दुंडाप्पा माळ्यागोळ, विठ्ठल सुरेश माळ्यागोळ (तिघेही रा. संगनकेरी), प्रकाश रामलिंगाप्पा वाल्मिकी (रा. आंबेडकरनगर, गोकाक), राघवेंद्र प्रकाश कोप्पद, रामाप्पा तळवार व मारुती रामाप्पा अरभावी यांचा समावेश आहे.
अधिक माहिती : मुख्य संशयित चिदानंद याने गुंतवणूक योजना आखली. एक लाख रुपये दिलेत, तर तुमच्या खात्यावर १ लाख ३० हजार रुपये जमा करतो, असे त्याने गुंतवणूकदारांना सांगितले. त्यानुसार फिर्याददार कल्मेश बसवराज रंगापूर (रा. मुडलगी) यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून स्वतःकडील ४८ लाख रुपये जमा केले. याशिवाय त्यांनी नातेवाईक चन्नबसाप्पा यांच्याकडून ४० लाख जमा केले. यानंतर बिराप्पा वनसन्नी यांच्याकडून ५० लाख, कल्पेश गोकाक ५० लाख व शंकर जक्कन्नवर यांच्याकडून ८० लाख अशी एकूण २ कोटी ६८ लाख इतकी रक्कम जमा झाली असून, ती कुठे जमा करायची, अशी विचारणा कल्मेश यांनी चिदानंदला केली.
लुटीचे पूर्वनियोजन
मोठी रक्कम जमा केल्यानंतर लाखाला ३० हजार कोठून देणार, हा प्रश्न चिदानंदच्या मनात आला. त्यामुळे त्याने वेगळीच युक्ती लढवली. सर्व रक्कम एकत्रित करून ती मोजूया, असे सांगत म्हणत त्याने सर्वांना ती रक्कम घेऊन ३० ऑक्टोबर रोजी मुडलगी येथील बिराप्पा वनसन्नी याच्या शेडमध्ये बोलावले. तेथे चिदानंदसह हे सगळे जण पैसे मोजत होते. तथापि, आधीच केलेल्या युक्तीनुसार गुंतवणूकदार रक्कम घेऊन आल्यानंतर दरोडा पडला, असे भासविण्यासाठी चिदानंदने एक टीम बनवली होती. त्यानुसार रात्री पावणेबाराच्या सुमारास उपरोक्त संशयितांपैकी आठजण शेडमध्ये शिरले. त्यांनी उपस्थितांच्या डोळ्यात चटणीपूड टाकून ही रक्कम लुटली.
मुडलगी पोलिसांनी दरोडा अशी नोंद करून घेत तपास सुरू केला असता घरचाच भेदी निघाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार नऊजणांना अटक झाली. पोलीस प्रमुख के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाकचे उपअधीक्षक रवी नायक, मुडलगीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल ब्याकुड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.