खानापूर : खानापूर-रामनगर महामार्गाचे अर्धवट काम व अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या जागोजागी असलेल्या अडथळ्यांमुळे अपघात व बळींची संख्या वाढली आहे. लोंढा रेल्वे फाटकाजवळ धोकादायरीतीने लावलेल्या सिमेंटच्या बॅरिकेडला धडकून दुचाकीस्वार तरुण ठार झाला. शुक्रवारी (दि. 16) रात्री साडेनऊ वाजता हा अपघात घडला. न्हाऊ बाबू खरत (वय 23, रा. वरकड, ता. खानापूर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, वरकड-पाट्ये क्रॉसपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यावर कोणतीही पूर्वसूचना, रिफ्लेक्टर अथवा प्रकाश व्यवस्था नसताना रहदारी वळविण्यासाठी सिमेंटचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीची जोराची धडक बसली. या भीषण अपघातात न्हाऊ याच्या डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागून तो जागीच ठार झाला. खानापूर-लोंढा महामार्गावर अनेक ठिकाणी पूल व रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. लोंढा रेल्वे फाटकानजीक चांगल्या रस्त्यावरुन आलेल्या वाहनचालकांना समोर रस्ताकामाच्या ठिकाणी बाजू बदलायची आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे, वारंवार अपघात घडत आहेत. निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असून महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.