बेळगाव : घरात गणरायाचे आगमन... दिवसभर उत्साहाचे वातावरण... महाप्रसादाची लगबग... पाहुण्यांची वर्दळ आणि कष्टाच्या पैशातून मिळवलेल्या आनंदाचे चार क्षण. दिवसभर इतरांना प्रेमाने महाप्रसादाचे जेवण वाढणाऱ्या या कुटुंबाला रात्री आपल्या घरातच काळ इतका क्रूर आघात करेल, याची कल्पनाही नव्हती. गणेशोत्सवाच्या आनंदात दिवस संपवून झोपी गेलेल्या चव्हाट गल्ली-ढोर गल्लीतील धमुणे कुटुंबावर पहाटेच्या आधीच काळाने घाला घातला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात हळहळ आहे.
गजानन धमुणे हे पेंटरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पत्नी शारदा गवंडी गडीकाम करत होत्या. मुली प्रिया आणि गंगा खासगी नोकरी करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. भारती धमुणे या पडदे शिवणे, साड्या तसेच इतर टेलरिंगचे काम करून संसाराला हातभार लावत होत्या. मुलगा रोशन हा उद्यमबाग येथे कामाला जात होता. प्रत्येकाच्या हाताला काम आणि कष्टाला प्रतिष्ठा देत हे कुटुंब आपला संसार उभा करत होते.
रोजच्या मोलमजुरीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर चालवणे, मुलांचे शिक्षण आणि संसाराचा गाडा ओढणे असे धमुणे कुटुंबाचे आयुष्य सुरू होते. मात्र, गणेशोत्सवाचा दिवस त्यांच्या आयुष्यातील शेवटचा आनंदाचा दिवस ठरेल, असे स्वप्नातही कुणाला वाटले नव्हते. गणेशोत्सवाच्या दिवशी धमुणे कुटुंबाने मोठ्या आनंदाने महाप्रसादाचे आयोजन केले होते. परिसरातील अनेकांना प्रेमाने बोलावून जेवण घातले. दिवसभर घरात आनंदाचे वातावरण होते. महाप्रसाद आटोपल्यानंतर घरातील सर्वांनी स्वच्छता केली. दिवसभराच्या धावपळीनंतर थकलेले कुटुंब रात्री निवांत झोपी गेले. मात्र, त्यानंतर काही तासांतच घराला लागलेल्या आगीने या कुटुंबाचा संपूर्ण संसारच भस्मसात केला.
घरात टेलरिंगच्या कामासाठी आणलेले नायलॉनचे पडदे, कपडे आणि इतर साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याचे सांगितले जात आहे. आगीने घराला वेढा दिल्यानंतर परिस्थिती इतकी भयावह झाली की, मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांनाही काय करावे, हे सुचेना. काही क्षणांतच आनंदाचे वातावरण आक्रोशात बदलले. घरातील दोन सदस्य गजानन आणि रोशन हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील आधारस्तंभच या दुर्घटनेत जखमी झाल्याने पुढील उपचार आणि संसार उभा करण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू सेट माजी आमदार अनिल बेनके, प्रशासनातील अधिकारी तसेच विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी घटनास्थळी भेट देऊन धमुणे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले. मात्र, शब्दांपलीकडचे हे दुःख आहे. आयुष्यभर कष्ट करून उभा केलेला संसार एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्यानंतर उरलेल्या कुटुंबीयांच्या वेदना शब्दांत मावणाऱ्या नाहीत. कुटुंबाला केवळ सांत्वनाची नव्हे, तर उपचार, पुनर्वसन आणि पुन्हा उभे राहण्यासाठी समाजाच्या आधाराची गरज आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार राजू सेट, पुत्र अमान सेट यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. मंगळवारी सकाळी पालकमंत्री सतीश जारकिहोळी, माजी आमदार अनिल बेनके, भाजप नेते किरण जाधव, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त प्रकाश निकम, महापालिका आयुक्त कार्तिक एम. आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.