Ration Shop Pudhari
बेळगाव

Ration Shops: रेशन दुकान महिनाभर सुरु राहणे बंधनकारक

स्थायी आदेश असूनही वितरणात गोंधळ : सकाळी व सायंकाळी रेशन वितरणाची वेळ

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहर व ग्रामीण भागात सरकारमान्य स्वस्त धान्य वितरण दुकान (रेशन दुकान) आठवड्याची व सरकारी सुट्टी वगळता महिनाभर सुरु ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, काही दुकानदार रेशन नसल्याचे कारण देत महिन्यातील १२ ते १५ दिवसच दुकान सुरु ठेवत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत रेशन वितरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

रेशन असो वा नसो दिवसभर दुकान सुरु ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, रेशन वितरण सुरळीत होत नसल्याने दुकानदारांना दुकान सुरु ठेवणे जमत नाही. शहरात रेशन वितरणाला महिन्याच्या १० तारखेला सुरुवात होते. रेशन ताब्यात घेऊन ते दुकानात आणून ठेवेपर्यंत महिन्याची १५ तारीख उजाडते. त्यानंतर वितरण प्रक्रिया सुरु होते. यात सर्व्हर डाउनची समस्या उद्‌भवत असल्याने रेशन वितरणात व्यत्यय येतो. प्रत्येक ग्राहकाला महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत रेशन देणे सक्तीचे आहे. मात्र, रेशन वितरण करणारे दुकानदार रेशन कोटा संपला आहे. तुम्ही दुसऱ्या दुकानातून रेशन घ्या. बायोमेट्रीक पद्धतीत व्यत्यय येत आहे. सर्व्हर डाउन समस्या उद्भभवली आहे अशी कारणे देत ग्राहकांना रेशन देणे टाळतात अशा तक्रारी वाढत चालल्या आहेत.

रेशन वितरण सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते ८ या वेळेत वितरण करणे बंधनकारक आहे. ग्राहकांना त्यांच्या वेळेत नोकरी, व्यवसाय सांभाळून रेशन घेता यावे यासाठी ही वेळ ठरविली आहे. एका दुकानात २०० ते २५० रेशनकार्डधारक असतात. सर्व्हर डाउन समस्या नसेल तर आठच दिवसात रेशन वितरण प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर रेशन वितरणचे काम नसल्याने आम्ही रेशन वितरण दुकान बंद ठेवतो. सर्व्हर डाउन समस्या उद्‌भवली तर आम्हाला रात्री दहापर्यंत थांबून रेशन वितरण प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यावेळेला आम्ही सरकारी नियम लावत नाही, असे शहरातील रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT