खानापूर : पंचहमी योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी, लाभार्थ्यांची गैरसोय आणि अधिकाऱ्यांच्या माहितीतील विसंगतीवरुन शुक्रवारी (दि. २०) खानापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात झालेल्या हमी योजना आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली.
रेशनसाठी लाभार्थ्यांकडून १० ते २० रुपये आकारले जात असल्याच्या तक्रारी तसेच गृहलक्ष्मीचे पैसे कर्जफेडीसाठी वळते करण्याचा प्रकार बैठकीत समोर आला. अपूर्ण माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील बैठकीत संपूर्ण तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
तालुका पंचहमी अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पाचही हमी योजनांच्या अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. गृहज्योती योजनेची माहिती देताना अधिकारी प्रवीण बरगाले म्हणाले, ऑक्टोबरमध्ये वीजबिलापोटी २ कोटी १७ लाख १३ हजार रुपयांची रक्कम माफ झाल्याचे सांगितले. मात्र, मोदेकोपमध्ये ऊसशेतीला लागलेल्या आगीबाबत सदस्यांनी जाब विचारला असता ट्रान्सफॉर्मरमधून ठिणगी पडल्याने आग लागल्याचे पंचनाम्यात नमूद असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्याचे सांगण्यात आले. फुलेवाडीतील ट्रान्सफॉर्मर जागेअभावी बदलता येत नसल्याचे व इदलहोंड शाळेजवळील ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे आश्वासनही देण्यात आले. नंदगड विभागातील अधिकारी वीरेश चकडीमठ यांना नोटीस बजावल्याचे सांगण्यात आले. गृहलक्ष्मी योजनेचे अधिकारी संदीप देशमुख यांनी तालुक्यात ६७,४३२ लाभार्थी असून दरमहा १३ कोटी ४४ लाख ३२ हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याची माहिती दिली.
यावेळी अध्यक्ष कुलकर्णी यांनी काही बँका लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणारे दोन हजार रुपये कर्जाच्या परतफेडीसाठी वळते करीत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. गृहलक्ष्मीचे पैसे कर्जवसुलीसाठी कपात करु नयेत, अशा स्पष्ट सूचना प्रत्येक बँकेला देण्याचे आदेश त्यांनी सीडीपीओ कार्यालयाला दिले. गुंजी आणि जांबोटी येथील बँकांना नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले.
सदस्यांनी आहार निरीक्षक संतोष यमकनमर्डी यांना धारेवर धरले. मागील १७ बैठकांमध्ये मागितलेली माहिती अद्याप पूर्णपणे सादर केली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. पुढील बैठकीत सर्व प्रलंबित माहिती सादर न केल्यास अन्न विभागावर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव मांडण्यात आला. दरम्यान, रुग्णांना व वयोवृद्धांना घरपोच रेशन देण्याच्या योजनेची तालुक्यातील अंमलबजावणी किती झाली, याची दुकाननिहाय यादी पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. खानापूर शहरात काही रेशन दुकानदार लाभार्थ्यांकडून १० ते २० रुपये घेत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या. मात्र, यावर अन्न निरीक्षकांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
परिवहन अधिकारी सत्याप्पा मेत्री यांनी ऑक्टोबरमध्ये महिलांनी १ कोटी ८९ लाख ४० हजार ४०८ रुपये रकमेच्या मोफत प्रवासाचा लाभ घेतल्याची माहिती दिली. सर्व बस जुन्या बसस्थानकातून नवीन बसस्थानकाकडे सोडण्याची व्यवस्था करावी, तसेच एक दिवस बस कंट्रोलरची करंबळ क्रॉस येथे नियुक्ती करावी, अशी सूचना करण्यात आली. युवा निधी योजनेचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित असल्याने योजनेचा आढावा घेता आला नाही. बैठकीला समितीचे सदस्य प्रकाश मादार, बाबू हत्तरवाड, रुद्राप्पा पाटील, शांताराम गुरव, गोविंद पाटील, प्रियंका गावकर, जगदीश पाटील, युसूफ हारगी, इसाखान पठाण, राजा कुडाळे, विवेक तडकोड आदी उपस्थित होते.