बेळगाव : बेकायदेशीररित्या विक्रीसाठी नेण्यात येत असलेला अन्नभाग्य योजनेंतर्गत रेशनवर दिला जाणारा तांदूळ अन्न व नागरी पुरवठा खाते आणि माळमारुती पोलिसांनी मंगळवारी (दि. ६) रात्री जप्त केला. त्यामध्ये २ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा ११,७०० किलो तांदूळ व ६ लाखांचा ट्रक असा ८ लाख ६३ हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. या प्रकरणी ट्रकचालक विजय नारायण भोसले (रा. वडगाव पनगरी, ता. माण, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कर्नाटकात अन्नभाग्य योजनेंतर्गत गरीबांना मोफत तांदूळ दिला जातो. दैनंदिन गरजेपेक्षा अधिक असलेल्या तांदळाची सामान्यांकडून विक्री केली जाते. शिवाय रेशन दुकानदारही यातील बराच तांदूळ शिल्लक ठेवून तो काळ्या बाजारात विकतात. हा तांदूळ महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात नेला जातो. असा तांदूळ आझादनगरमधील इंडिया गॅरेजजवळ साठवल्याची माहिती माळमारुती पोलिसांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता येथे तांदळाची पोती आढळून आली.
याची माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याला दिल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी जाऊन बेकायदशीर साठवणूक असल्याचे सांगितले. त्यानुसार तो जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे साहाय्यक संचालक इलियास मणियार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. माळमारुतीचे पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.