बेळगाव : पावसाचा जोर कायम असल्याने राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत रोज वाढ होत आहे. मंगळवारी (दि. 1) पाणीपातळी 2,471.30 फुटांवर पोहचली. जलाशय तुडुंब होण्यासाठी 2,474 फूट पाण्याची गरज असून रोज एक ते दोन फुटाने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे, आणखी तीन फूट पाणी जमा झाल्यास जलाशय तुडुंब होणार आहे.
दोन दिवसात कधीही जलाशय तुडुंब भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जलाशय तुडुंब झाल्यानंतर पाणीपातळी कायम राखण्यासाठी जलाशयाचे दरवाजे उचलण्याची तयारी पाणीपुरवठा मंडळ करत आहे. जलाशय भरत असले तरी शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नसून पाच दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे.
शहरात सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाल्याचे जाणवत असले तरी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यातच राकसकोप तुडुंब भरणार अशी शक्यता एलअॅण्डटी कंपनीने वर्तवली होती. मात्र, पावसाने रविवारपासून उघडीप दिल्याने जूनमध्ये जलाशय तुडुंब झाले नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जलाशय भरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी पाणीपातळी 2,470.50 फुटांपर्यंत पोचली होती. मंगळवारी पाणीपातळी पुन्हा एक फुटाने वाढून पातळी 2,471.30 फुटांवर पोचली. आता जलाशय काठोकाठ भरण्यासाठी अवघे तीन फूट पाणी कमी आहे. पावसाचा असाच जोर कायम राहिला तर बुधवार किंवा गुरुवारी रात्रीपर्यंत राकसकोप जलाशय काठोकाठ भरणार आहे. तत्पूर्वी, जलाशयाचे सहापैकी तीन दरवाजे दोन ते तीन इंचाने उचलण्याची तयारी पाणीपुरवठा मंडळ करत आहे.
दरवाजे उघडल्यानंतर जलाशयातून मार्कंडेय नदीत पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यास हिंडलगा, अलतगा, कंग्राळीपर्यंतची शिवारे पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिंडलगा पंपिंग सेंटरमध्येही खबरदारी घेण्यात आली असून यंत्रणा पाच ते दहा फुटांवर उचलण्याची तयारी एलअॅण्डटी कंपनीचे कर्मचारी करत आहेत. पाणी कधीही वाढू शकत असल्याने असा इशारा एलअॅण्डटी कंपनीने कर्मचार्यांना दिला आहे.
पावसाळ्यात शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसाआड केला जातो. मात्र, यंदा पावसाळा सुरु होऊन दीड महिना लोटला तरी एलअॅण्डटी कंपनी पाच दिवसाआडच पाणीपुरवठा करत आहे. राकसकोप जलाशय भरण्याच्या मार्गावर असून पाणीपुरवठा तीन दिवसाआड करावा, अशी मागणी ग्राहक करत आहेत.