बेळगुंदी : राकसकोप धरणावर गुरुवारी पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी फिरावयास गेलेल्या पर्यटकांची निराशा झाली. अनेकजण माघारी फिरले. याठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले होते.
मकर संक्रांतीनंतर गुरुवारी सार्वजनिक सुट्टी होती. त्यामुळे अनेकजण पर्यटनासाठी राकसकोप धरणावर आले होते. सकाळपासून पर्यटकांची गर्दी वाढली होती. अनेकजण पार्टी करण्याच्या तयारीने येत होते. परंतु, त्याठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले होते. पर्यटकांना धरण परिसरात सोडण्यात आले नाही. अनेक पर्यटक सुट्टी दिवशी धरण परिसरात पार्टी करतात. त्यानंतर धरणात उतरतात. यातून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनेक पर्यटक हुल्लडबाजी करतात. याला आळा घालण्यासाठी पर्यटकांना धरण परिसरात सोडण्यात आले नाही. माघारी परतणारे पर्यटकांनी हाजगोळी (ता. चंदगड) परिसराला पसंती दिली होती. आपला मोर्चा पर्यटकांनी हाजगोळी धरण परिसराकडे वळविला. यामुळे त्याठिकाणी दिवसभर गर्दी झाली होती.