बेळगाव : शहर परिसरासह तालुक्यात शनिवारी पावसाचे आगमन झाल्याने गार हवा, रिमझिम पाऊस असे दुपारनंतर वातावरण होते. मृग नक्षत्रात प्रथमच दमदार पाऊस झाल्याने पावसाळी वातावरणाची अनुभूती शहरवासीयांना आली. शेजारच्या चंदगड तालुक्यात शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस होता. त्यामुळे बेळगाव परिसरात पाऊस बळावण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 14 जूननंतर मान्सून सक्रिय होण्याचा वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे.
यंदा 8 जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले, तरी पावसाचा पत्ता नसल्याने हे नक्षत्र कोरडे जाणार का, ही भीती होती. हवामान विभागाने 14 जूनपासून पावसाचे संकेत दिले होते. त्यानुसार शनिवारी दुपारपासून वातावरणात बदल झाले. दुपारी रिमझिम पाऊस सुरू झाल्यानंतर हवेत गारठा निर्माण झाला होता. पावसाला सुरुवात झाल्याने शहरात रेनकोट, छत्र्या वापरणार्या विद्यार्थी, नागरिकांनी लक्ष वेधले. रस्त्यावर भरदुपारी अंधूक उजेड असल्याने लाईट सुरू करून वाहने चालवली जात होती. बाजारपेठेत दुपारी तुरळक वर्दळ होती.
शहर परिसरात 20 मेनंतर पावसाची संततधार सुरू झाली होती. मान्सूनपूर्व पावसाला जोडूनच मान्सून दाखल झाल्याने मे महिन्यातच संततधार पावसाची अनुभूती आली. जून सुरू होताच पावसाने उसंत घेतल्यानंतर पेरणीची कामे करण्याचे नियोजन सुरू झाले. दहा दिवसांत पावसाने उसंत घेतल्याने भात पेरणीला गती आली होती. अपेक्षेप्रमाणे उघडीप मिळाल्याने पेरणीची कामे उरकण्यास मदत झाली. बेळगाव तालुक्याच्या दक्षिण व पूर्व भागात बहुतांश पेरण्या झाल्या असून हा पाऊस उगवणीसाठी पोषक ठरला आहे. शिल्लक शेतात रोपलागवडीचे नियोजन केले जात आहे.
नैऋत्य मान्सून पाऊस किनारपट्टीवर सुरू झाला आहे. यामुळे उत्तर कर्नाटकात जोरदार पाऊस पडत आहे. दक्षिणेकडील अंतर्गत भागातही हा पाऊस विखुरला आहे. पुढील तीन दिवस पाऊस सुरूच राहील. त्यामुळे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर बेळगाव, धारवाडला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने कारवार, मंगळूर, उडुपी, कोडगू, चिक्कमगळूर आणि शिमोगा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बेळगाव, धारवाड, हावेरी, हसन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात मान्सून सक्रिय आहे. शुक्रवारी (दि. 14) अगुम्बे येथे 11 सेंमी मुसळधार पाऊस नोंदवण्यात आला.
हवामान विभागाच्या बंगळूर प्रादेशिक केंद्राच्या माहितीनुसार, मंगळूर येथे 9 सेंमी, उडुपी 8 सेंमी, भटकळ, बेलतांगडी येथे प्रत्येकी 7 सेंमी, सिद्धापूर, कुंदापूर, गोकर्ण, पुत्तूर येथे प्रत्येकी 6 सेंमी पावसाची नोंद झाली आहे. चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ हवामान राहील आणि आणखी तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.