बेळगाव

Belgaum Rain: कृष्णा, मार्कंडेयच्या पाणीपातळीत वाढ

येडूर-कल्लोळ बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली मार्गावरील रहदारी पूर्णपणे ठप्प

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव /अंकली : कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह महाराष्ट्रातील विविध जलाशय परिसरात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे, चिकोडी तालुक्यातील येडूर-कल्लोळ मार्गावरील कृष्णा नदीवरील बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला असून या मार्गावरील रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे.

गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील विविध जलाशय परिसर तसेच कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात आणि कृष्णेला मिळणाऱ्या उपनद्यांच्या खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. बंधारा पाण्याखाली गेल्याने येडूर-कल्लोळ मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

गेल्या चार दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरु होती. मात्र, मंगळवारी (दि. २१) पावसाचा जोर वाढल्याने पावसाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतीकामांना येत्या काळात अधिक वेग येणार आहे.

चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. परंतु, पावसाला जोर नव्हता. पावसाच्या हलक्या सरींबरोबर उन्हेही पडत होती. त्यामुळे, शेतकऱ्यांकडून संततधार पावसाची प्रतीक्षा करण्यात येत होती. शेतीकामांसाठी जोरदार पावसाची गरज आहे. अशातच मंगळवारी पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

मार्कंडेय नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. यामुळे येत्या काळात नदी काठावरील शिवारांतून भात रोपलागवडीला जोर येणार आहे. शेतीच्या कामांना गती येण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. सलग पाऊस झाल्यास शेतामध्ये पाणी साचण्यास मदत होणार आहे.

तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाला अधिक प्रमाणात जोर होता. बेळगुंदी, बिजगर्णी, राकसकोप, यळेबैल, उचगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील आठवड्यात मार्कंडेयचे पाणी खालावले होते. काही दिवसांपासून पावसाळा पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT