बेळगाव

Belgaum Rain: बेळगाव, खानापूर, निपाणी, चिकोडीत संततधार

जनजीवन विस्कळीत; जिल्‍ह्यात सरासरी १६२ मि.मी. पाऊस

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : यंदा लांबलेल्‍या पावसाने गेल्‍या दोन दिवसांपासून जिल्‍ह्यात हजेरी लावल्‍याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्‍ह्यात शनिवारी सर्वत्र पावसाचा जोर वाढला होता. त्‍यामुळे नदी, नाल्‍यांच्‍या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

खानापूर, निपाणी, चिकोडी तालुक्‍यांतही संततधार पावसाने जनजीवनावर परिणाम झाला. जिल्‍ह्यातील कृष्‍णा, वेदगंगा, दूधगंगा नद्यांच्‍या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या राकसकोप जलाशयात दोन फुटाने वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, तर काही ठिकाणी झाडे कोसळण्‍याच्‍या घटना घडल्‍या. जिल्‍ह्यात सरासरी १६२ मि.मी. पावसाची नोंद झाली.

शहरात शनिवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले. कॅम्प परिसरात ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली. धर्मवीर संभाजी चौकात पाणी साचल्याने बसथांब्‍यात पाणी शिरले. इस्लामिया हायस्कूलची संरक्षक भिंत ढासळल्याने मोठे नुकसान झाले. कॉलेज रोडवरील गटारीच्या पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी वनिता विद्यालयात शिरले. शनिवारी मुख्य बाजाराचा दिवस असल्याने बाजारहाट करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची त्रेधातिरपीट उडाली. भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांची धावपळ झाली.

कॅम्प परिसरात ठिकठिकाणी झाडे पडल्याने ती हटवण्यासाठी कॅण्टोन्मेंट बोर्डचे कर्मचारी सकाळपासून कामाला लागले होते. सुदैवाने या घटनेत कोठेही जीवितहानी झाली नाही. हेस्कॉमने देखील संततधार पावसात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केला. शुक्रवार रात्री व सकाळी पावसाने शहर परिसरात जोरदार हजेरी लावली.

कॅम्प परिसरात ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली. हिंडलगा गणपती मंदिरनजीक संरक्षक भिंतीवरून झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली. हेस्कॉमने झाडांच्या फांद्या हटवल्यानंतर तातडीने वीजपुरवठा सुरळीत केला. कॅम्पमधील इस्लामिया हायस्कूलची संरक्षक भिंत शनिवारी सकाळी सातच्या सुमारास कोसळली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, सकाळी या मार्गावर रहदारी कोंडी झाली. इस्लामिया हायस्कूलजवळ ज्योती सेंट्रल स्कूल, कॅण्टोन्मेंट बोर्ड प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल, सेंट मेरीज स्कूल असल्याने रोज या मार्गावर विद्यार्थी व पालकांची वर्दळ असते.

शनिवारी सकाळी शाळेची वेळ ८.१५ बदलल्यामुळे दुर्घटना टळली. गटारीतून पाण्याचा निचरा न झाल्याने सखल भागात मोठ्या प्रामाणात पाणी साचून राहिले. शहरात दरवर्षी पाण्याचा निचरा न झाल्याने काही ठिकाणी पाणी तुंबून राहते. शनिवारी समर्थनगर, गांधीनगर ओव्हरब्रीज, महाद्वाररोड जिजामाता चौक, अंबाभुवन, नरगुंदकर भावे चौक, पाटील गल्ली, शनिमंदिर, गोगटे सर्कल, बेळगाव- खानापूर रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्‍याने वाहनचालकांना पाण्यातून वाहने हाकताना कसरत करावी लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT