बेळगाव : आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर परिसरासह अनेक ठिकाणी शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी सुमारे दोन तास मोठा पाऊस पडला. शहरासह शहापूर भागात मोठा पाऊस झाल्याने भाग जलमय बनला होता. गाडेमार्ग तर जणू जलमार्ग बनला होता.
जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रातील भात पिकांना हा पाऊस उपयुक्त असल्याने शेतकर्यांनाही दिलासा मिळाला आहे. आठ दिवसानंतर पडलेल्या पावसाने वातावरणात गारठा निर्माण झाला होता.
गत वर्षीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने अधिक काळ दडी मारली. आठ दिवसात पाऊसही खूपच अत्यल्प होता. त्यातच कडक ऊन असल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रातील भात उत्पादक शेतकर्यांनाही चिंता लागून होती. पिकांच्या वाढीवर परिणाम होण्यास प्रारंभ झाला होता. मात्र शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रातील भात पीक तसेच अन्य पिकांना मोठा दिलासा मिळाला.
गत आठ दिवसांमध्ये हवेतील उष्माही अधिक प्रमाणात वाढला होता. गत काही दिवसांपासून सप्टेंबर महिन्यामध्येच ऑक्टोबर हिटची झळ बसत होती. आता उष्णतेतही घट झाली आहे.
शहापूर सखल भागात पाणी साचल्याने गाडेमार्ग जलमय झाला होता. बिच्चू गल्ली कॉर्नर ते आचार्य गल्ली कॉर्नर यादरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून होते. यातून वाहनचालकांना वाट काढताना कसरत करावी लागली. खडे बाजार, मारुती गल्ली तसेच शहापूर, खडे बाजार येथील बाजारपेठेमध्येही अचानक मोठा पाऊस आल्याने व्यापार्यांची, विक्रेत्यांची धावपळ उडाली. अनेक भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. फिरत्या विक्रेत्यांचाही गोंधळ झाला.
गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते मात्र पाऊस पडला नाही. तर शुक्रवारी सकाळपासून ऊन्हाची तीव्रता अधिक होती.