मलिकवाड : दत्तवाड बंधार्‍यानजीक पात्राबाहेर पडलेले दूधगंगेचे पाणी. Ardra Rains Belgaum  (Pudhari File Photo)
बेळगाव

Ardra Rains Belgaum | जिल्ह्यामध्ये ‘आर्द्रा’ची दमदार हजेरी

Chikkodi Subdivision Flood | चिकोडी उपविभागातील सात पूलवजा बंधारे पाण्याखाली : प्रशासन सतर्क

पुढारी वृत्तसेवा

Belgaum District Weather

बेळगाव, चिकोडी : आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवार, दि. 22 रोजी आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली. सोमवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला असून, दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. खानापूर, निपाणी, चिकोडी तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्याने चिकोडी उपविभागातील सात पूलवजा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. खानापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. खानापूर-हेम्माडगाझाड कोसळून वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.

पावसामुळे शहरांत अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. सायंकाळी पावसाने जोर धरला होता. दिवसभर पावसाला म्हणावा तसा जोर नसला तरी रिपरिप सुरू होती. सायंकाळी मात्र जोर वाढला होता. पावसामुळे बाजारपेठेतील जनजीवन विस्कळीत झाले होते. खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना तसेच बैठे विक्रेत्यांना छत्री व रेनकोटचा आधार घ्यावा लागला. पावसामुळे अनेक ठिकाणी दलदल झाली होती. शहरात काही ठिकाणी गटारी तसेच रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी पावसामुळे पाणी साचून होते.

यावर्षी वळवाने अक्षरश: झोडपून काढले होते. त्यानंतर लागलीच मान्सूनला सुरुवात झाली. त्यामुळे बळीराजाने घाईगडबडीतच खरिपाची पेरणी केली. शेतकरी पेरणी करताना मृगनक्षत्राने चांगली साथ दिली. पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने पेरणी पूर्ण करता आली. खरीप पिकांची उगवण बर्‍यापैकी झाली आहे.

चिकोडी उपविभागात पावसाची संततधार सुरू आहे. दुसरीकडे शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातदेखील अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात वाहणार्‍या कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन नद्या पात्राबाहेर वाहत आहेत. पावसाचा जोर वाढल्याने चिकोडी उपविभागातील नदीकाठावरील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला असून सात पूलवजा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कृष्णा नदीवरील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधार्‍यातून 79 हजार 785 क्युसेक पाण्याचा विसर्ग तर दूधगंगा नदीतून 17600 क्युसेक असा एकूण 98 हजार 385 क्युसेक पाण्याचा विसर्ग चिकोडी तालुक्यात कृष्णा नदीवरील कल्लोळ बंधार्‍याजवळ होत आहे.

चिकोडी उपविभागातील एकूण 7 बंधार्‍यांवर पाणी आल्याने अद्यापही या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. चिकोडी उपविभागातील कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने झाल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे.

प्रशासनाकडून खबरदारी

चिकोडी येथे प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व खात्यांच्या अधिकार्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नदीकाठावरील गावांमध्ये स्थानिक महसूल व पोलिस कर्मचार्‍यांना तैनात करण्यात आले आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बोटी, लाईफ जॅकेट व जीवनावश्यक साहित्य सज्ज ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT