बेळगाव

Belgaum Police Raids: पाच जिल्ह्यांतील १,०४१ गुंडांच्या घरांवर छापे

आयजीपींच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : गणेशोत्सव व अन्य सणांच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या गुंडांच्या घरांवर पोलिसांनी छापे टाकले. तब्बल १,०४१ गुंडांच्या घरांची झडती घेऊन आक्षेपार्ह वस्तू व साहित्य जप्त करण्यात आले. बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

उत्तर परिक्षेत्रातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड व गदग जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राऊडी शीटर्स आहेत. गणेशोत्सवासह आता विविध सण तोंडावर आले आहेत. या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये. कुणीही कायदा हाती घेऊ नये, यासाठी आयजीपी पाटील यांनी सर्व जिल्हा पोलिसप्रमुखांना राऊडी शीटर्सच्या घरांची झडती घेण्याची सूचना दिली होती. त्याची अंमलबजावणी करत पाचही जिल्ह्यांमध्ये जे विविध गुन्ह्यांमध्ये यापूर्वी सक्रिय होते अशा १,०४१ गुंडांच्या घरांची झडती घेण्यात आली.

गुंडांच्या घरासमोर लावलेल्या वाहनांपैकी २७ वाहनांची कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यांची नोंदणी नसल्याने ती जप्त केली आहेत. शिवाय नऊजणांकडे मालमत्तेची कागदपत्रे सापडली असून ती बेकायदेशीर असल्याचा संशय असल्याने ताब्यात घेतली आहेत. ही झडती घेताना दोन गुंड गेल्या अनेक महिन्यांपासून फरारी होते. त्यांनाही अटक केली आहे. या कारवाईचे आयजीपी पाटील यांनी कौतुक केले आहे.

जिल्हानिहाय टाकलेले छापे

बेळगाव : २०१

विजापूर : ४८२

बागलकोट : ११७

धारवाड : ४६

गदग : १९५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT