बेळगाव

Belgaum news: ‘डीसी’ कार्यालयासमोर आज आंदोलन

मध्यवर्ती समितीकडून आयोजन : मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सरकारी कार्यालयांवर मराठीतून फलक लावण्यात यावेत, मराठीतून सरकारी कागदपत्रे द्यावीत, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी सोमवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठी भाषिकांनी ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले.

मराठा मंदिर सभागृहाच्या कार्यालयात रविवारी (दि. २१) मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत कन्नडसक्तीविरोधातील नियोजित मोर्चाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र एकीकरण समितीने धर्मवीर छ. संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता; पण जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याआधी सर्व सदस्यांचे मनोगत ऐकून घेण्यात आले.

यावेळी मध्यवर्ती म. ए. समिती कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हा प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली असली, तरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमून आंदोलन करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. या मोर्चासंदर्भात आतापर्यंत दोनवेळा जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. आता आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून आंदोलन करावे लागणार आहे. आमच्या मागण्यांची दखल जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी घेऊन त्यांनी सर्वांसमोर चर्चा करावी, अशी आमची अट आहे. आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, त्यासंदर्भात राज्य सरकारला अहवाल पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारला पाठविण्यात येणारा अहवाल आम्हालाही देण्यात यावा, अशी आमची मागणी असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कर्नाटकचे सीमा प्राधिकरण अध्यक्ष एच. के. पाटील यांच्याशी बैठक ठरवितो, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा करू शकता काय, असे विचारले होते. या साऱ्या बैठकांचे नियोजन जिल्हा प्रशासन करत असेल तर आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवण्यास तयार आहोत. असे असले तरी जिल्हा प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आपली ताकद दाखविणे आवश्यक आहे. आम्ही अधिक संख्येने एकत्र येत नाही, तोपर्यंत अधिकारी आमच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करत राहणार आहेत, त्यामुळे सकाळी ११ वाजता अधिकाधिक संख्येने एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

मध्यवर्ती समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे म्हणाले, म. ए. समितीच्या मोर्चासाठी गावोगावी आणि संपूर्ण शहरात जनजागृती केली आहे. त्यामुळे आमच्यावर जिल्हा प्रशासनाने दबाव घातला तरी मोर्चा रद्द न करता थेट जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, ॲड. एम. जी. पाटील, रामचंद्र मोदगेकर, अनिल पाटील, शिवाजी खांडेकर, डी. बी. पाटील, मनोहर हुंदरे, मारुती परमेकर, आबासाहेब दळवी, जयराम देसाई, मोनाप्पा पाटील, जयराम देसाई, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, लक्ष्मण होनगेकर, नेताजी जाधव, आर. के. पाटील, बी. डी. मोहनगेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. एम. बी. गुरव, राजू मरवे, नारायण सांगावकर, बाळाराम शेलार, विठ्ठल पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT