बेळगाव

Belgaum Protest : आंदोलन चिघळले; अचानक रास्ता रोको

सायंकाळी बेळगावात ट्रॅफिक जाम; डीसी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या, गुप्त बैठकीचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने मंगळवारी अधिक तीव्र स्वरूप धारण केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. शिवाय ठरावीक शेतकऱ्यांचीच गुप्त बैठक घेत असल्याची तक्रार करत सायंकाळी अचानक चन्नम्मा चौकात रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे तासभर रहदारीवर परिणाम झाला. शेवटी पुन्हा प्रमुख १५ शेतकरी नेत्यांना एकत्र बैठकीला बोलावून बैठक घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरूच होती. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने वकिलांनी दिवसभर काम बंद आंदोलन केले.

ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार दुपारपासून शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होऊ लागले. मात्र, निर्धारित वेळ उलटूनही बैठक सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या मांडला. शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यानंतर सर्व शेतकरी संघटनांना एकत्रितपणे विश्वासात घेऊन चर्चा करण्याऐवजी मोजक्या नेत्यांसोबत बैठक घेतली जात असल्याची माहिती आंदोलनस्थळी पोहोचताच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.

गुप्त बैठक घेतल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी कित्तूर चन्नमा चौक येथे रास्ता रोको केला. त्यानंतर प्रशासनाने आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी तातडीने जिल्हा पंचायत सभागृहात बैठक बोलावली. आमदार चन्नराज हट्टीहोळी, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, पोलिस आयुक्त प्रकाश निकम आणि जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. ऊस दराच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली; मात्र प्रतिटन ५,५०० रुपये दराच्या मागणीवर कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

जिल्हा पंचायत सभागृहातील बैठकीत तोडगा न निघाल्याने प्रमुख १० ते १५ शेतकरी प्रतिनिधींना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार रात्री उशिरा ही बैठक सुरू झाली. ऊस दराचा तिढा सोडविण्यासाठी वरिष्ठ लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले, तरी शेतकऱ्यांच्या ५,५०० रुपयांच्या मागणीवर तोडगा निघणार की पुन्हा चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रात्री उशिरापर्यंत बैठकीचे सत्र सुरू असल्याने आंदोलनाबाबतही अनिश्चितता कायम होती.

३७०० रुपये निश्चित होणार?

ऊस दराच्या चर्चेदरम्यान पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्वसाधारणपणे प्रतिटन ३७०० रुपये दर देण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविल्याचे दिसून आले. मात्र, त्यावर शेतकरी प्रतिनिधींनी कोणताही निर्णय घेतला नाही. ३७०० दरावर शासनाने प्रतिटन एक हजार रुपये अतिरिक्त प्रोत्साहनधन द्यावे, या मागणीवर शेतकरी ठाम होते. त्यामुळे ३७०० रुपये आणि अतिरिक्त एक हजार रुपयांच्या मागणीवर एकमत होऊ शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT