बेळगाव : महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी तीन ऑनलाईन जनस्नेही सेवांचा प्रारंभ केला आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून आता दुपटीहून अधिक वसुली होत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.
महापालिकेने चार दिवसांपूर्वी एसएमएस, व्हॉटस् ॲप आणि युपीआयद्वारे मालमत्ता कर भरण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. ज्या मालमत्तांची एक लाखाहून अधिक थकबाकी आहे, त्यांची यादी तयारी करण्यात आली आहे. त्यांच्यावर धडक कारवाई करण्यात येत आहे. अनेकांना नोटिसा बजावण्यात आली आहे. ऑनलाईन सेवेमुळे कर वसुली वाढली आहे, अशी माहिती देण्यात आली.
महापालिकेत याआधी रोज तीन ते चार लाख रुपयांचा करभरणा होत होती. पण, आता मोबाईलद्वारे कर भरणा करता येत असल्यामुळे रोज १२ ते १४ लाख रुपयांची कर भरणा होत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. महापालिकेने यंदा ९० कोटी रुपयांचे निर्धारीत उद्दिष्ट गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. व्यावसायिक आणि वाणिज्य इमारतींचे पुनर्मोजणी करण्यात येत आहे. तर एक लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. त्यात आता ऑनलाईन सेवांमुळे कर भरणा करण्यात वाढ झाली आहे.
असा करा कर भरणा
व्हॉट्स ॲप चॅटबॉट : महापालिकेने सुरु केलेल्या ७०९००२२८८८ या अधिकृत व्हॉटस् ॲप क्रमांकावर मेसेज करून थकीत कर तपासू शकता, कर भरू शकता आणि पावतीची प्रत डाउनलोड करु शकता.
अधिकृत वेब पोर्टल : महापालिका belagavicitycorp.org या संकेतस्थळावर मालमत्ता कर मालमत्ता क्रमांक (पीआयडी), वॉर्ड क्रमांक किंवा मालकाच्या नावाने कर शोधू शकता आणि ऑनलाईन भरणा करु शकता.
युपीआय आणि बीबीपीएस ॲप्स : भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमवर 'Municipal Tax' पर्याय निवडून घरबसल्या कर भरता येतो.
कर्नाटक वन : कर्नाटक वन पोर्टलद्वारेही ऑनलाईन सेवा विभागातून मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ऑनलाईन जनस्नेही सेवांमुळे कर वसुलीत वाढ झाली आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी दुपटीहून अधिक करभरणा होत आहे. अधिकाधिक लोक या सेवांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे महापालिकेचे कर संकलन वाढत आहे.- डॉ. सिद्धू हुल्लोळी, महसूल उपायुक्त