बेळगाव : मुचंडीतील (ता. बेळगाव) महालक्ष्मी व मरगाईदेवी यात्रेनिमित्त सोमवारी (दि. १८) झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने ४५ व्या मिनिटाला बॅक थ्रो डावावर अस्मान दाखवत कुस्तीप्रेमींची मने जिंकली. सिद्धेश्वर मंदिराशेजारी रंगलेल्या मैदानात ६० हून अधिक कुस्त्यांची मेजवानी मिळाली.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील वि. इरफान इराण यांच्यात प्रथम क्रमांकाची लढत केदारी जोंधाळे व कुस्तीगीर कमिटीतर्फे लावण्यात आली. पहिल्या मिनिटालाच पृथ्वीराजने आक्रमक होत इरफानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पाचव्या मिनिटाला पृथ्वीराजने बॅक थ्रो डावावर चित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यानंतर पृथ्वीराजकडून घिस्सा, एकचाक, झोळी असे डावपेचही अयशस्वी ठरले. ४० मिनिटानंतरही कुस्ती निकाली होत नसल्याने दोन-दोन मिनिटाचा ताबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. नाणेफेक जिंकून पहिला ताबा इरफानने घेतला. दोन मिनिटानंतर पृथ्वीराजने ताबा घेताच बॅक थ्रो डावावर इरफानला चितपट करत कुस्तीप्रेमीची मने जिंकली.
महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांत शिंदे व हरियाणा केसरी वीरेंद्रकुमार यांच्यातील दुसरी कुस्ती देवस्थान कमिटीतर्फे लावण्यात आली. प्रशांतने वीरेंद्रकुमारला दहाव्या मिनिटाला एकेरी कस डावावर अस्मान दाखवले. कर्नाटक केसरी कामेश पाटीलने सूरज मुंडे (कोल्हापूर) याला सातव्या मिनिटाला घुटना डावावर पराभूत केले. प्रेम जाधव वि. अक्षय चौगुले यांच्यातील पाचवी कुस्ती वीस मिनिटानंतर बरोबरीत सोडविण्यात आली. सहाव्या कुस्तीत कोल्हापूरच्या तेजस गोफणेने इराप्पा अथणीला तर आठव्या कुस्तीत कार्तिक इंगळगीने बबलू नरळेवर गुणावर विजय मिळवला. सचिन शिरगुप्पे वि. साताप्पा कोल्हापूर ही सातवी कुस्ती बरोबरीत सुटली. दहाव्या कुस्तीत संभाजी काकतीने पाचव्या मिनिटाला पिल्या कोल्हापूरला झोळी डावावर चितपट केले.
भूमिपुत्र मुतगा वि. सनी कुसाळे, कुबेर पिरनवाडी वि. वैष्णव कुद्रेमानी, तुकाराम किणये वि. नचिकेत रणकुंडे यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. अन्य कुस्तीत रामदास काकती, ध्रुव मणिकेरी, महांतेश संतीबस्तवाड, अफान मजगाव, प्रणव उचगाव, विनायक येळ्ळूर यांनीही विजय मिळवले. पंच म्हणून बाळाराम पाटील, अतुल शिरोळे, पिराजी मुचंडीकर, शिवाजी पाटील, परशराम मोदगेकर, गणपत बनोशी, विश्वनाथ पाटील यांनी काम पाहिले.