बेळगाव : बेळगाव व खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. ग्राम पंचायतींवर प्रशासकराज आले आहे. आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर गावपातळीवर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुका लवकरच होण्याची शक्यता गृहित धरुन इच्छुकांनी आजी, माजी, नवख्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. माजी सदस्य गुप्त बैठका घेऊन पॅनल बनविण्याच्या तयारीला लागले आहेत.
अलीकडे ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पक्षांचा शिरकाव झाला असला तरी अपक्ष उमेदवारांचीच चलती आहे. पण, राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छूक स्थानिक तसेच जिल्हास्तरीय नेत्यांच्या गाठीभेटी घेऊ लागले आहेत. त्यातच तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकांची शक्यता असल्याने इच्छूक उमेदवार मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणे, शर्यत, स्पर्धांचे आयोजन करणे, मंदिर बांधकाम व जीर्णोद्धारासाठी भरीव देणगी देणे, विकासकामांसाठी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेणे यावर भर देण्यात येत आहे. पक्षीय पातळीवरील रसद आणि रणनीती महत्त्वाची ठरत असल्याने या मोर्चेबांधणीला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
इच्छूक उमेदवारांचा गावफेरी, जनसंपर्क अशा माध्यमांतून मतदारांशी नाते जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. गावपातळीवरील उत्सव, पूजाविधी, खेळ, स्पर्धा, धार्मिक यात्रा अशा माध्यमांतून मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. विविध ‘सामाजिक’ कारणांनी आयोजित केलेल्या मेजवान्या, भेटीगाठी, सांस्कृतिक कार्यक्रम या साऱ्यांतून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. देवांच्या नावाने होणाऱ्या या सोहळ्यांमागे राजकीय हेतू लपलेले आहेत, असा गावकऱ्यांचा सूर आहे. एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधीच गावपातळीवर चैतन्य निर्माण झाले असून, पुढील काही महिने राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत.
मतदारांची भूमिका महत्वाची
ग्राम पंचायत निवडणूक ही केवळ सत्तेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया नसून ती गावाच्या भविष्यासाठी दिशा निश्चित करणारी संधी असते. त्यामुळे, इच्छुकांच्या घोषणांमागील वास्तव तपासून त्यांच्या कृतींचा मागोवा घेऊन आणि भावनिक, धार्मिक अथवा आर्थिक प्रलोभनांना न भुलता मतदारांनी सुज्ञ निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.