बेळगाव

Belgaum Heroin Seizure : दोन लाखांचे ११ ग्रॅम हेरॉईन बेळगावात पोलिसांकडून जप्त

बसवाण गल्लीतील तरुणाला अटक : सीसीबी पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बसवाण गल्लीतील तरुणाला अटक करून त्याच्याकडून २ लाख १५ हजार रूपये किमतीचे ११ ग्रॅम हेरॉईन पोलिसांनी जप्त केले. संदीप विजय अनगोळकर (वय २७, रा. बसवाण गल्ली, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. सीसीबी पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही कारवाई केली.

संदीपचे किराणा दुकान आहे. त्याच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती सीसीबीचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला. त्याच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन तपास केला असता सुमारे ११ ग्रॅम हेरॉईन लहान १२२ पाकिटांमध्ये ठेवल्याचे आढळून आले. हेरॉईन तसेच त्याच्याकडील एक मोबाईल जप्त केला. सीसीबीचे निरीक्षक नाईक, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

मुंबईच्या अम्माकडून खरेदी

बेळगावात हेरॉईन हे मुंबईमधील सायन कोळीवाडा येथून येत असल्याचे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले आहे. तेथील अम्मा नामक महिला त्याचा पुरवठा करते. यापूर्वी तिच्याविरोधात पोलिसांनी प्रत्येकवेळी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणातील संशयितानेही तिच्याकडूनही हेरॉईन आणल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्यावरही संशयित क्रमांक दोन म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT