बेळगाव : नियमांचे उल्लंघन करून मद्यविक्री व सेवनास परवानगी देणाऱ्या तसेच निर्धारित वेळेनंतर मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक साऊंड सिस्टीमचा वापर करणाऱ्या हॉटेल, बार, क्लब आणि पबचालकांविरोधात बेळगाव शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. शनिवारी (दि. १०) रात्री पोलिस आयुक्त प्रकाश निकम आणि पोलिस उपायुक्त नारायण बरमनी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सुमारे ६० ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांच्या मालक व व्यवस्थापकांविरोधात विविध पोलिस ठाण्यांत एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील हॉटेल, बार, क्लब, पब आणि अन्य आस्थापनांमध्ये नियमबाह्य पद्धतीने मद्यविक्री व सेवन सुरू असल्याच्या तसेच निर्धारित वेळेचे उल्लंघन करुन रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपकांचा वापर होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली. विविध पोलिस ठाण्यांच्या पथकांनी एकाचवेळी अनेक ठिकाणी तपासणी केली. यावेळी मद्यविक्री व सेवनासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन, ध्वनीक्षेपक व साउंड सिस्टीमचा नियमबाह्य वापर झाल्याचे निदर्शनास आलेल्या आस्थापनांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली.
संबंधित मालक व व्यवस्थापकांविरोधात कर्नाटक पोलीस कायदा, उत्पादन शुल्क कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार १५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच रात्रीच्या वेळी होणारा ध्वनिप्रदूषणाचा त्रास रोखणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नियंत्रण ठेवणे, हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे पोलिसस आयुक्त प्रकाश निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बालमजुरांचाही शोध
मोहिमेवेळी बालमजुरांचाही शोध घेण्यात आला. तसेच शहरात अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचाली आढळल्यास लोकांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन बेळगाव शहर पोलिसांनी केले आहे.