Belgaum Crime File Photo
बेळगाव

Belgaum Crime: अमली पदार्थांविरोधात पोलिसांचा धडाका

सात गुन्हे दाखल; हेरॉईन, गांजा व मद्य जप्त, एकाकडून तलवारही हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलिस ठाण्यांनी शनिवारी (दि. २०) अमली पदार्थ, अवैध मद्यविक्री आणि शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवून सात गुन्हे दाखल केले. एपीएमसी, मार्केट, माळमारुती आणि मरिहाळ पोलिस ठाण्यांच्या पथकांनी केलेल्या या कारवायांमध्ये हेरॉईन, गांजा, मद्यसाठा, एक धारदार तलवार तसेच दुचाकी आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धेश्वरनगर येथील साई मंदिराजवळ दादापीर अब्दुल खान (वय २३, रा. सहावा क्रॉस, आझमनगर, बेळगाव) हा हेरॉईन विक्रीचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक विठ्ठल हावण्णावर आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच हजार रुपये किमतीचे २.५५ ग्रॅम हेरॉईन आणि १० हजार रुपये किमतीची मोपेड असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एपीएमसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत शाहूनगर तलावाजवळ सुफियान आफताब पीरजादे (रा. पहिला क्रॉस, आझमनगर, बेळगाव) हा गांजा विक्रीचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून पाच हजार रुपये किमतीचा ४७२ ग्रॅम गांजा आणि १५ हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध एपीएमसी पोलिसांनी एनडीपीएस कायद्याच्या कलम २० (ब) (i) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

माळमारुती पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवबसवनगरमधील जुन्या पॉलिटेक्निक वसतिगृहाजवळ प्रकाश प्रदीप परमानी (रा. गॅंगवाडी, बेळगाव) हा गांजा विक्रीसाठी उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक उदय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच प्रकाश बॅग टाकून पळून गेला. पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यात पांढऱ्या कापडात बांधलेला ५८५ ग्रॅम गांजा आढळून आला. सुमारे २० हजार रुपये किमतीचा हा गांजा जप्त करण्यात आला असून फरार संशयिताच्या विरोधात माळमारुती पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंजर गल्ली परिसरात तबरेज इस्माईल मुल्ला (वय २५, रा. वीरभद्रनगर, बेळगाव) हा संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. मार्केटचे पीएसआय मणिकांत पुजारी आणि त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता त्याने अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केट पोलिसांनी समर्थनगर, तिसरा क्रॉस येथे पांडुरंग मंजुनाथ टक्केकर (वय २३, रा. समर्थनगर, बेळगाव) याच्याकडून एक धारदार तलवार जप्त केली होती. त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा आणि कर्नाटक पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारिहाळ पोलिसांनी हुदली गावातील यल्लम्मादेवी मंदिराजवळ सत्तेप्पा तल्लुर (वय ३५, रा. नायक गल्ली, हुदली) याच्याकडून अवैध मद्यसाठा जप्त केला. मार्केट पोलिसांनी परवानगीशिवाय मद्याची वाहतूक करणाऱ्या संशयित महिलेकडून विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्या जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बेळगाव शहर पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांनी या सर्व कारवायांमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT