बेळगाव : नीट घोटाळ्यापासून स्पर्धा परीक्षेबाबत जिल्हा व पोलीस प्रशासन गंभीर बनले आहे. रविवारी २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठीच्या लेखी परीक्षेसाठीही पोलिस खात्याने विशेष खबरदारी घेतली आहे. परीक्षा काळात गैरप्रकार आढळल्यास दोषीला ५ वर्षाची शिक्षा व दहा लाखांचा दंड होणार असल्याचे पत्रक पोलिस आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिले आहे.
रविवारी शहरासह जिल्ह्यातील विविध केंद्रांवर सिव्हील पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठी लेखी परीक्षा होणार आहे. अशा भरती परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी व पारदर्शकता आणण्यासाठी कर्नाटक सार्वजनिक परीक्षा (नियुक्तीतील भ्रष्टाचार व गैरप्रकार निर्बंध अधिनियम २०२३ नुसार नियम जारी केले आहेत.
उमेदवार परीक्षेत कॉपी करत असल्यास, कोणाचे अनधिकृत सहकार्य घेत असल्यास, एकाच्या नावावर दुसरा कोणी परीक्षेला बसल्याचे आढळल्यास, प्रश्नपत्रिका बाहेर पाठवणे व त्याची उत्तरे मागवून घेण्याचा प्रकार उढळून आल्यास, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका अनाधिकृतरित्या आढळून आल्यास, इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून गैरप्रकार केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
नीटनंतर ही कारवाई अधिकच कडक करण्याचे आदेश राज्य परीक्षा मंडळाने दिले आहेत. त्यानुसार असा काहीही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधिताला ५ वर्षांची शिक्षा व किमान दहा लाख दंड ठोठावला जाणार आहे. प्रश्नपत्रिका फोडणे, एखादी संघटना अथवा अन्य अनधिकृत ग्रुप बनवून त्याद्वारे असा काही प्रकार आढळून आल्यास यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ८ ते १२ वर्षाची शिक्षा व १५ लाख ते १० कोटींपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
एखादा उमेदवार गैरप्रकार करताना आढळल्यास त्याला डिबार करण्याचा त्यांच्याकडील साहित्य जप्त करण्याचा व संबंधिताला ताब्यात घेण्याची तरतूदही कायद्यात आहे. अटक झाल्यास अजामीनपात्र व दखलपात्र व स्पष्टीकरण न ऐकता अटक करण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. याची परीक्षार्थींसह, प्रशिक्षण संस्था, पालक यांनी दखल घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घ्यावी. असा प्रकार कुठे आढळून आल्यास त्याची माहिती त्वरित नजिकच्या पोलिस ठाण्याला अथवा परीक्षा प्राधीकरणला द्यावी, असे आवाहन पोलिस खात्याने केले आहे.