बेळगाव : पोलिस आयुक्त भूषण बोरसे गेल्या सव्वा वर्षांपासून बेळगावात उत्तम काम करत आहेत. सर्वधर्मीय, भाषिकांना एकत्रितरित्या घेऊन जाताना बेळगावच्या कायदा व सुव्यवस्थेलाही त्यांनी प्राधान्य दिले आहे. अशा अधिकाऱ्याची इतक्या घाईने बदली का केली जात आहे, असा प्रश्न बेळगावकरांतून केला जात आहे. त्यांची बदली थांबवावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
बोरसे यांनी मे २०२५ मध्ये आपल्या पदाची सूत्रे घेतल्यापासून कामाचा धडाका लावला आहे. अमली पदार्थमुक्त बेळगावसाठी त्यांनी आधीपासूनच रोखठोक काम केले आहे. त्यांनी कार्यभार घेतानाच शहरातील तरुणाई नशामुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांची वाटचाल सुरु आहे. याशिवाय मटका, जुगार यावरही त्यांनी चांगलेच नियंत्रण मिळवले आहे. सतत घडणाऱ्या घरफोड्या कमी होण्यासाठी लॉक्ड हाऊस बीट पद्धत, वाढते अपघात व त्यामध्ये होणारे मृत्यू कमी करण्यासाठी फक्त बेळगाव शहरच नव्हे तर अगदी महामार्गावरील बडेकोळ्ळमठापर्यंत जाऊन अनेक उपाययोजना करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.
स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून बोरसे यांची प्रतिमा आहे. आजतागायत बेळगावात काम केलेल्या पोलीस आयुक्तांच्या तुलनेत बोरसे यांचे काम उठून दिसणारे आहे. त्यामुळे त्यांची बदली घाईगडबडीत करु नये, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. मटका, जुगारी अड्ड्यांसह बेकायदेशीर धंदे चालवणाऱ्यांना त्यांची बदली व्हावी असे वाटत असले तरी सर्वसामान्य जनतेला मात्र अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची बेळगावला गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी गेल्यावर्षीचा गणेशोत्सव शांततेत आणि व्यवस्थित पार पाडला आहे. यंदाचा गणेशोत्सवही असाच शांततेत होण्यासाठी त्यांची गरज आहे. त्यांच्या बदलीला आमचा विरोध आहे. यासंदर्भात आम्ही काहींनी नुकतीच पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांची भेट घेतली आहे.- रमाकांत कोंडुसकर, अध्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ बेळगाव
पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी रहदारीला शिस्त लावण्यापासून बेकायदेशीर धंद्यावर करडी नजर ठेवण्याचे काम केले आहे. अशा कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याची घाईत बदली केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांची बदली तातडीने रद्द करावी, अशी आमची मागणी आहे.- सुजित मुळगुंद, सामाजिक कार्यकर्ते
जात, पंथ, भाषाभेद विसरुन काम करणारे एक अभ्यासू व्यक्तिमत्व अशा प्रतिमेचे पोलिस आयुक्त बेळगावकरांना लाभलेले आहेत. त्यांची इतक्या तडकाफडकी बदली केली जात आहे, हे पाहून आश्चर्य वाटत आहे. सरकारने त्यांची बदली रद्द करावी, अशी माझ्यासह अनेकांची मागणी आहे.- मल्लेश चौगुले, दलित नेते, सामाजिक कार्यकर्ते