बेळगाव : विना डीजे, लेसर वा प्रखर दिव्यांना टाळून शिस्तबद्ध मिरवणूक काढून समाजात एक आदर्श निर्माण करणाऱ्या तीन मंडळांना पोलिस आयुक्तालयातर्फे पुरस्कार दिला जाणार आहे. पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पोलिस खात्याकडून अशा प्रकारचा पुरस्कार जाहीर करण्याची ही पहिलीच घटना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध संघटनांना काही स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक तसेच राजकीय व्यक्तींकडून पुरस्कार दिले जातात. परंतु, पोलिस आयुक्त निकम यांनी पहिल्यांदाच शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी आयुक्तालयामार्फत तीन मंडळांना पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
गेल्या महिनाभरापासून पोलिस खात्याकडून गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. पोलिस खात्याने मिरवणुकीसाठी काही निकष व अटी घालून दिलेल्या आहेत. यातील पहिली व महत्वाची अट म्हणजे मिरवणुकीत कर्णकर्कश डीजे लावायची नाही. ध्वनीक्षेपकही सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसार लावला पाहिजे. आजकाल डोळ्यांना त्रास करणारे प्लाझ्मा, एलईडी व लेसर किरणे अशी लायटिंग लावण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.
पारंपारिक वाद्ये, टाळ मृदंगाचा गजर व वेळेचे भान राखून शिस्तबद्ध रितीने मिरवणूक निघावी, अशी अपेक्षा पोलिस खात्याला आहे. या निकषात बसणाऱ्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावून आयुक्तांच्या हस्ते बक्षीस दिले जाणार आहे. संपूर्ण मिरवणुकीवर पोलिसांची नजर राहणार आहेच, शिवाय या मिरवणुकीसाठी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे स्वयंसेवक या मिरवणुकीवर लक्ष ठेवून राहणार आहेत. काही स्वयंसेवी संस्थाही संपूर्ण मिरवणुकीवर नजर ठेवणार आहेत. या सर्वांच्या निकषातून त्या तीन मंडळांची निवड केली जाणार आहे.
बेळगावचा गणेशोत्सव शहराचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. हा गणेशोत्सव आतापर्यंत सुरळीतपणे चालत आलेला आहे. मिरवणुकीसाठी न्यायालयाने काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. त्याचे अनेक मंडळांकडून उल्लंघन होताना दिसते. ते होऊ नये व मंडळांना शिस्त लागावी, या उद्देशाने त्यांना यंदा पुरस्काराची घोषणा केली आहे. शहरातील सर्व मंडळांकडून शिस्तबद्ध मिरवणुकीला प्राधान्य दिले जावे, अशी अपेक्षा आहे.- प्रकाश निकम, पोलिस आयुक्त