निपाणी : कंपनीच्या कामासाठी भाडोत्री तत्त्वावर ट्रॅक्टर हवे आहेत, अशी बतावणी करून कमी किमतीत ट्रॅक्टर विकणार्या पुणे व सातारा जिल्ह्यातील आंतरराज्य टोळीतील पाच संशयितांना निपाणी बसवेश्वर चौक पोलिसांनी बुधवारी अटक केली. अटक करण्यात आलेल्या पाच जणांकडून 68 लाखांच्या 15 ट्रॅक्टरपैकी 37 लाख रुपये किंमतीचे 8 ट्रॅक्टर जप्त केले. निपाणी पोलिसांनी वरील दोन जिल्ह्यात पंधरा दिवस मुक्काम ठोकून ही कारवाई केल्याने जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
अजय संतोष चव्हाण (वय 23, रा. सरताळे ता. जावळी जि. सातारा), आकाश अंकुश गुडे (वय 33, रा. मुरमा, ता. बारामती, जि. पुणे) दत्तात्रय संताजी गाडेकर (वय 23 रा. वाकी, चोपडाजा ता. बारामती, जि. पुणे) सोमनाथ शंकर ढमाळ (वय 36, रा. मसोबाचीवाडी, ता. इंदापूर जि. पुणे), पुष्कर पुष्पशील साळुंखे (वय 31 रा. मसोबाचीवाडी, ता. इंदापूर जि. पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, रमेश सिद्धगोंडा माळी (रा. पांगिरे-ए ता. निपाणी) यांचा ट्रॅक्टर ऊस वाहतुकीसाठी बेडकीहाळ येथील वेंकटेश्वरा शुगरकडे कार्यरत होता. दरम्यान 6 सप्टेंबर 2025 रोजी माळी यांची या परिसरात आलेल्या संशयित अजय चव्हाण याच्याशी ओळख झाली. अजय याने रमेश माळी यांना विश्वासात घेत सातारा जिल्ह्यात आपण एका कंपनीचे मुख्य ठेकेदार आहोत. यासाठी आपल्याला 15 ट्रॅक्टर हवे आहेत, असे सांगितले. आपण प्रत्येक ट्रॅक्टरला महिन्याला 30 हजार रुपये भाडे देतो असे सांगितले. त्यानुसार माळी यांनी परिसरातील अन्य ट्रॅक्टर मालकांसमवेत चर्चा केली. यावेळी रमेशसह इतर 14 जणांनी चव्हाण याला 15 ट्रॅक्टर भाडे तत्वावर दिले. त्यानंतर तिसर्याच महिन्यात अजयकडून भाडे स्वरूपात ठरविण्यात आलेली 35 लाख 30 हजार रक्कम थकली. त्यामुळे माळी यांच्यासह 14 जणांना संशय आल्याने माळी यांनी अजय चव्हाण याच्याविरोधात 8 नोव्हेंबर 2025 रोजी फसवणुकीची फिर्याद बसवेश्वर चौक पोलिसांत दिली.
त्यानुसार जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त जि. पो. प्रमुख आर. बी. बसरगी, डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार राजू दिवटे, एम. ए. तेरदाळ, मारूती कांबळे, प्रशांत कुदरी, लक्ष्मण कुदरी यांच्यासह तांत्रिक विभागाच्या विशेष पथकाने 15 दिवस पुणे व सातारा जिल्ह्यात तपास करीत मुख्य संशयित अजय चव्हाण याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने आपण 8 मित्रांच्या मदतीने सर्व ट्रॅक्ट विविध गावातील शेतकर्यांना कमी किमतीत विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांना अजय यांच्यासह वरील चौघांना ताब्यात घेऊन त्यांनी विकलेल्या 15 ट्रॅक्टरपैकी 8 जप्त केले. तसेच त्याच्यावर फसवणुकीसह चोरीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्यांना कळंब, उस्मानाबाद पोलिसांकडे चौकशीसाठी रवानगी केल्याची माहिती उपनिरीक्षक रमेश पवार यांनी दिली.
15 दिवस मुक्काम करून तपास
रमेश माळी यांच्या फिर्यादीनुसार अजय चव्हाण याने उस्मानाबाद जिल्ह्यात अशाच प्रकारची फसवणूक केल्याचे आढळून आले. त्यानुसार बसवेश्वर चौक पोलिसांनी प्रारंभी कळंब (ता. उस्मानाबाद) पोलिसांशी संपर्क साधून तेथील अटकेतील अजय चव्हाण याला न्यायालयाच्या परवानगीने तपासासाठी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा 15 दिवस मुक्काम करून तपासात उलगडा झाला. या प्रकरणातील अद्यापही 3 संशयित फरार असून उर्वरित 7 ट्रॅक्टर लवकरच जप्त करू, अशी ग्वाही सीपीआय बी. एस. तळवार यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.