बेळगाव

Eksamba Fire: प्लास्टिक साहित्याचे गोदाम जळून खाक

एकसंबा येथील घटना : सुमारे १ कोटींचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

एकसंबा : येथील प्लास्टिक साहित्याच्या गोदामाला बुधवारी रात्री भीषण आग लागून गोदामामधील सर्व साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १ कोटी ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे चार-पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बुधवारी रात्री सुमारे ८ च्या सुमारास नाईकबा मंदिराजवळ असलेल्या माणिक कल्लाप्पा वडगावे यांच्या प्लास्टिक साहित्याच्या गोडाऊनला अचानक आग लागली. शेजारील रहिवाशांनी याची माहिती वडगावे यांना दिल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. गोदामामध्ये प्लास्टिकच्या खुर्च्या, टेबल, बुट्ट्या, पाईप आदी साहित्य मोठ्याप्रमाणात साठवून ठेवले होते. प्लास्टिक साहित्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. घटनेची माहिती मिळताच चिकोडी, सदलगा तसेच कोरे कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

गोदाम पत्र्याच्या शेडचे असल्याने आतमध्ये पाणी मारण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने गोदामाचा दरवाजा व पुढील काही पत्रे काढण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. पण तोपर्यंत गोडाऊनमधील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते.आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. मध्यरात्रीपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. सुमारे चार-पाच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT