fraud Pudhari
बेळगाव

Belgaum Crime: न मागवलेल्या ऑनलाईन पार्सलद्वारे लाखाची लूट

भामट्यांचा लुटीचा नवा फंडा : पार्सल मागविताना सावधानता बाळगण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : तुमचे ऑनलाईन पार्सल आले आहे, असे सांगत आधी ते पार्सल घरी देत याची ठराविक रक्कमही घेतली. परंतु, या कुटुंबाने हे आपले पार्सल नव्हे, असे सांगितले तेव्हा हो, ते दुसऱ्याचे आहे, आम्ही सांगतो तसे करा. तुमची घेतलेली ५०५ रुपयांची रक्कम परत पाठवतो, असे म्हणत एपीके फाईल पाठवून वृद्धाची लाखाची लूट केल्याचा प्रकार बेळगाव परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर वृद्धाने गुरुवारी (दि. २३) दुपारी एकच्या सुमारास शहर सीईएन पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार याची नोंद झाली आहे.

आजकाल फ्लीपकार्ट, अमेझॉनसह विविध ॲपद्वारे बहुतांश वस्तू ऑनलाईन पार्सल मागवण्याची टूम आली आहे. परंतु, भामटे याचाच कसा फायदा उठवून फसवणूक करु शकतात, हे नुकतेच बेळगावातील गणेशपूर परिसरातील सरस्वतीनगरमध्ये उघडकीस आले आहे. १५ जुलै रोजी सरस्वतीनगरमधील आप्पाण्णा नामक वृद्धाच्या घरी एक अनोळखी तरुण गेला. फ्लीपकार्टवर तुम्ही ऑर्डर केलेले पार्सल आले आहे, असे सांगितले. यावेळी सदर वृद्ध घरी नसल्याने त्यांच्या पत्नीने हे पार्सल घेऊन समोरच्या भामट्याने याचे ५०५ रुपयेही घेतले. आप्पाण्णा घरी आले असता त्यांनी हे पार्सल उघडून पाहिले. परंतु, हे त्यांचे नसल्याने त्यांनी ते परत करण्यासाठी पार्सलवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला.

दिलगिरी व्यक्त, लाख गायब

आप्पाण्णा यांनी या क्रमांकावर संपर्क केला असता समोरच्या भामट्याने आधी दिलगिरी व्यक्ती केली. माफ करा ते पार्सल तुमचे नाही चुकून तुमच्या घरी दिलेले आहे. तुमची रक्कम परत पाठवतो, तुमचे युपीआय आहे का, अशी भामट्याने विचारणा केली. यावेळी आप्पाण्णा यांनी फोन-पे असल्याचे सांगितले. त्यावर आम्ही तुमची ५०५ रुपयांची रक्कम पाठवतो तपासून पाहा, असे सांगितले. यावेळी आप्पाण्णा यांनी रक्कम जमा झाली नसून आपली आहे तितकीच १ लाख ३२९ रुपये असल्याचे भामट्याला सांगितले.

एपीके फाईलद्वारे फसवणूक

त्यांच्या खात्यावर लाख रुपये आहेत, याची खात्री झाल्यानंतर भामट्याने त्यांना मोबाईलवर एक एपीके फाईल पाठवली. ती ओपन करुन पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करायला लावली. सदर वृद्धाने समोरील भामट्याला ओटीपी क्रमांकही दिला. यावेळी समोरच्या भामट्याने लगेचच आधी ९८ हजार, त्यानंतर २ हजार अशी एक लाख रुपये रक्कम आपल्या खात्यावर वर्ग करुन घेतली. ही घटना १५ जुलै रोजी दुपारी २ ते ४.३० या दरम्यान घडली. परंतु, आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुवारी त्यांनी शहर सीईएन पोलिस ठाणे गाठून याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT