बेळगाव : सीसीबी पोलिसांच्या पथकाने ५५ हजार रुपये किंमतीच्या गांजासह एकाला अटक केली तर पुरवठादारावर गुन्हा दाखल केला. अख्तर युसूफ शेख (वय ४२, रा. रुक्मिणीनगर) असे संशयिताचे नाव आहे. तर अन्य दोन ठिकाणी मटका व मद्यप्रकरणी काकती व मारीहाळ पोलिसांनी कारवाई केली.
अख्तर मिरजेतील (जि. सांगली) बलराम नामक व्यक्तीकडून गांजा आणून त्याची बेळगाव परिसरात विक्री करत असल्याची माहिती सीसीबी पथकला मिळाली. त्यांनी रामतिर्थनगरमधील क्रिकेट मैदानाजवळ सापळा रचून अख्तरला अटक करत त्याच्या ऑटोमध्ये ठेवलेला १ किलो १४८ ग्रॅम गांजा ताब्यात घेतला. याची किंमत ५५ हजार रुपये होते. गांजासह ऑटोही जप्त केली. सीसीबीचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
काकती पोलिसांनी मटका घेणाऱ्या संशयिताला अटक करुन त्याच्याकडून रोकड व मटका चिठ्ठ्या जप्त केल्या. भरमाप्पा वैजाप्पा कुंबरगी (वय २८, रा. ब्रह्मलिंगेश्वर गल्ली, देवगिरी, ता. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. काकतीचे उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी ही कारवाई केली. मारीहाळचे उपनिरीक्षक बी. एस. नाईक यांनी बेकायदेशीर मद्य विकणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मद्याची ८८ पाकिटे जप्त केली. बाळाप्पा द्यामाप्पा निट्टूर (वय ४२, रा. सोमनट्टी, ता. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे.