बेळगाव : निपाणी-मुधोळ मार्गावर स्फोटक सामग्रीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका युवकाला मुडलगी पोलिसांनी बुधवारी (दि. १९) दुपारी अटक केली. हळ्ळूर (ता. मुडलगी) गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून जिलेटिनच्या २०० कांड्या, १०० डेटोनेटर, ७५० मीटर डिफ्युझर वायर व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. युधिष्ठिरसिंग कर्णिमसिंग चुंडावत (वय २१, रा. अमननगर, मुडलगी) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावरील हारुगेरी क्रॉसजवळ दुचाकीवरुन चाललेल्या युधिष्ठिरसिंगला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी तो स्फोटक साहित्याची वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याला रायबागमधील रोशन जाट आणि प्रकाश चंदण्णा चाटा यांनी स्फोटक साहित्य पुरविल्याचे तपासात समोर आले असून त्यांच्याविरोधातही कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी संशयिताकडून ७५० मीटर डिफ्यूझर वायर, २०० जिलेटिन कांड्या, १०० डेटोनेटर व दुचाकी जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३७ हजार रुपये आहे. याप्रकरणी मुडलगी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८८ तसेच स्फोटक कायदा १८८४ मधील कलम ९(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक वाय. एस. बिसनाळ यांच्या नेतृत्वाखाली जगदीश मिर्जी, एस. जी. मन्नापूर व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.