बेळगाव : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच बेळगाव शहर आणि जिल्ह्यात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक वाढलेल्या उकाड्यामुळे लोक त्रस्त झाले असून दिवसाच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आगामी दिवसांत जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सध्या सकाळी ९ ते १० पासूनच उन्हाचा तडाखा सुरु होत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत सूर्यकिरण अत्यंत प्रखर होत असल्याने उकाड्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. सध्या बेळगावचा पारा तब्बल ३४ अंशांवर पोचल्याने ऑक्टोबर महिन्यातच ऐन उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी व सोमवारी शहरात कमालीचा उकाडा होता. रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले असून लोक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवर कमी वर्दळ पाहायला मिळत आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणारे लोक, विशेषतः दुचाकीस्वार उन्हापासून बचावासाठी टोपी आणि स्कार्फचा आधार घेत आहेत. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी बाजारपेठेत लिंबू सरबत, उसाचा रस, ताक आणि इतर थंड पेयांच्या टपऱ्यांवर लोकांची गर्दी दिसत आहे.
हवामानातील या बदलांमुळे पुढील काही दिवस तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. .पावसाळा संपत असतानाच पुन्हा उन्हाळा सुरु झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. हवेतील आर्द्रतेमुळे घामाच्या धारा लागणे आणि प्रचंड अस्वस्थता जाणवणे वाढले आहे. तीव्र ऊन आणि अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे डीहायड्रेशन, डोकेदुखी, आणि त्वचेच्या समस्या जाणवण्याचा धोका वाढला आहे.