निपाणी : नजीकच्या कोडणी येथील कुणाल विश्वास भिसे (वय १६) या नववीत शिकणाऱ्या होतकरू विद्यार्थ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि.२८) घडली. अवघ्या सोळाव्या वर्षी काळाने घाला घातल्याने संपूर्ण कोडणी गावावर शोककळा पसरली असून त्याच्या आकस्मिक जाण्यामुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयात कुणाल शिक्षण घेत होता. तो अत्यंत शांत, मनमिळाऊ आणि अभ्यासात हुशार विद्यार्थी म्हणून परिचित होता. शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये त्याने आपल्या स्वभावामुळे आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. त्याच्या निरागस स्वभावामुळे तो सर्वांचा लाडका होता.
कुणालच्या आयुष्याची उमलती कळी अकाली कोमेजल्याने भिसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनाची वार्ता गावात समजताच ग्रामस्थांनी त्याच्या निवासस्थानी धाव घेतली. घरातील कुटुंबीयांचा आक्रोश आणि अश्रूंनी उपस्थितांचेही काळीज हेलावून गेले. हसत-खेळत घरात वावरणारा कुणाल आता आपल्यात नाही, ही जाणीव कुटुंबीयांसह ग्रामस्थांना अस्वस्थ करणारी ठरली.
अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वर्गमित्रांनीही कुणालच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका होतकरू विद्यार्थ्याच्या अकाली जाण्याने कोडणी गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे.