Nipani schools holiday
निपाणी : निपाणी तालुक्यात सोमवारी पाठोपाठ मंगळवारीही दिवसभर पावसाचा जोर राहिल्याने तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांसह महाविद्यालयांना बुधवारी (दि. २०) सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार एम.एन.बळीगार यांनी दिली. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
गेल्या चार दिवसापासून निपाणी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. यात सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने शिवाय हवामान खात्याने जिल्ह्यासह तालुक्याला रेड अलर्ट जाहीर केल्याने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील महाविद्यालय वगळता प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुरक्षेच्यादृष्टीने मंगळवार दि. १९ रोजी केवळ सुट्टी देण्यात आली होती.
मात्र, मंगळवारी ही पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी रेड अलर्ट देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बुधवारी (दि.२०) तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांसह महाविद्यालयाचे कामकाज बंद राहणार असून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बुधवारी पाऊस परिस्थितीचा अंदाज घेऊन गुरुवार दि. २१ रोजी वाढीव सुट्टी देण्याचा विचार केला जाणार असल्याचेही बळीगार यांनी 'दै.पुढारी'शी बोलताना सांगितले.