निपाणी : दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून नाशिक येथील सात जणांची तब्बल १३३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे कथित प्रकरण गेल्या चार दिवसांपूर्वी उघडकीस आले. या प्रकरणात निपाणी येथील १२ जणांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यापैकी चौघांना बसवेश्वर चौक पोलिसांनी अटक केली असून, त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. मात्र, उर्वरित आठ संशयित अद्याप फरार असल्याने पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे.
गेल्या चार दिवसांपासून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी निपाणी पोलिसांनी पुणे, मुंबई येथे मुक्काम ठोकून कंबर कसली आहे. तर तपासाचे धागेदोरे आता बंगळूरपर्यंत पोहोचले असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. बेळगाव आणि बंगळूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील एका कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या व फसवणूक करणाऱ्या लोनार्स इन्व्हेस्टमेंट आणि नंदा ट्रेडर्स या कार्यालयांमधील संगणक, पीसी, हार्डडिस्क तसेच अन्य महत्त्वाची यंत्रसामग्री पोलिसांनी जप्त केली आहे.जिल्हा आणि राज्य पातळीवरील आयटी पथकाच्या माध्यमातून या साहित्याची तपासणी सुरू आहे. आर्थिक व्यवहारांचे स्वरूप, गुंतवणूकदारांची संख्या आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे नेमके धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे.
या तपासाला तांत्रिक बाबींची जोड द्यावी लागत असल्याने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी आणखी किमान पंधरवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, आठ संशयित फरार असल्याने त्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. या प्रकरणाची चर्चा शहरासह सीमाभागातही रंगली असून दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने पैसे गुंतवलेल्या अनेकांची घालमेल सुरू झाली आहे. गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यासह संबंधित जबाबदार व्यक्तींच्या घरांकडे धावाधाव सुरू केली आहे. संभाव्य फसवणुकीच्या भीतीने काहींनी आपला मुक्कामही बदलल्याची चर्चा आहे.त्यामुळे १३३ कोटींच्या या कथित घोटाळ्याचा नेमका पर्दाफाश कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गुंतवणूकदारांची चिंता वाढली; पैशांचे भवितव्य अधांतरी!
दामदुप्पट परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूक केलेल्या अनेकांची आता चिंता वाढली आहे. गुंतवणुकीची रक्कम परत मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित कार्यालयांमध्ये व्यवहार केलेल्या गुंतवणूकदारांकडून माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू असून, पोलिसांच्या तपासातून नेमके सत्य बाहेर येण्याची प्रतीक्षा आहे.आठ संशयितांचा शोध आणि जप्त केलेल्या संगणकीय साहित्याची तपासणी हे या प्रकरणातील महत्त्वाचे टप्पे ठरणार आहेत.