बेळगाव : टिळकवाडी क्लबचा ताबा घेण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत झाला असला तरी तो अद्याप घेतलेला नाही. हा विषय पुन्हा स्थायी समिती बैठकीत घेऊन आल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. क्लबकडून कर वसुलीबाबत तज्ज्ञांची मत घेण्यात यावे आणि पुन्हा या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा करावी, अशा सूचना करण्यात आल्या.
महापालिकेची अर्थ आणि कर स्थायी समिती बैठक शुक्रवारी (दि. 6) अध्यक्षा नेत्रावती भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी टिळकवाडी क्लबचा विषय चर्चेला आला. या क्लबचा ताबा घेण्याचा निर्णय झाला असला तरी स्थायी समिती बैठकीत का उपस्थित करण्यात आला आहे, अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी त्यांच्याकडून कर कशापद्धतीने आकारायचा, यासाठी हा विषय मांडण्यात आला असे सांगितले. याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करावी. विषय पुन्हा सर्वसाधारण सभेत मांडावा, असे सांगितले.
बापट गल्ली येथील कार पार्किंगमध्ये ठेका संपूनही वसुली करण्यात येत आहे. तो महसूल महापालिकेला मिळत नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात उभारण्यात येणार्या विविध जाहिरातींच्या करांबाबत, पोदार शाळेच्या कर वसुलीबाबत चर्चा करण्यात आली. तर ई-आस्तीबाबत लोकांना त्रास होत आहे. त्याठिकाणी अर्ज घेणे, तक्रारी निवारण आणि माहिती देण्यासाठी वेगळ्या कर्मचार्यांची नियुक्ती करावी, असे सांगण्यात आले. या बैठकीला महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली, सदस्य नितीन जाधव, नंदू मिरजकर, पूजा पाटील, प्रशासन उपायुक्त उदयकुमार तरवाळ, कौन्सील सेक्रेटरी प्रियंका विनायक आदी उपस्थित होते.
ई-आस्ती नोंदणीसाठी महापालिकेने 40 संगणक ऑपरेटर्सची नियुक्ती केली होती. त्यांची मुदत आता संपली आहे. पण, अद्याप ई-आस्तीचे काम सुरुच असल्यामुळे 40 पैकी 25 कामगारांची मुदत वाढवावी, अशा सूचना स्थायी समिती बैठकीत करण्यात आल्या.