बेळगाव : अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी दोघा आरोपींना तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्या. सविताकुमारी एन. यांनी हा निकाल दिला. पवन संजय भोकारे आणि सुमित्रा ऊर्फ सुनिता आनंद लामानी अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. कट रचून आनंद रमेश लम्मानी याची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपींना मृत आनंदच्या अनैतिक संबंधांबाबत संशय होता. त्यानंतर त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला. १८ मार्च २०२१ रोजी सायंकाळी आनंदला रामदुर्गला बोलावण्यात आले. त्याला मुलूर टेकडी परिसरात नेऊन मद्य देण्यात आले. त्यानंतर सालहळ्ळी-रामदुर्ग रस्त्यालगतच्या कालव्यानजीक नेण्यात आले. बन्नूर गावाच्या हद्दीत त्याला मारहाण करुन कालव्याच्या काठावर नेण्यात आले. तोंड धूत असताना त्याला मागून कालव्यात ढकलण्यात आले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास रामदुर्ग उपविभागाचे तत्कालीन पोलिस उपाधीक्षक रामनगौडा हट्टी यांनी केला. तपासानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने दोन्ही आरोपी दोषी असल्याचे ठरविले. या दोघांना न्यायालयाने जन्मठेप आणि दंड ठोठावला आहे. सरकारी वकील म्हणून आर. जी. देवरड्डी यांनी काम पाहिले.