Belgaum murder case Pudhari
बेळगाव

Belgaum murder case: सिगारेटच्या 70 रुपयांसाठी खून

कडोलीच्या युवकासह तिघांना अटक : बोडकेनट्टी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : यात्रेहून परतताना नशेचा अंमल असलेल्या चौघांनी रस्त्यात दुचाकी थांबवून दुकानात सिगारेट व पाणी बाटली घेतली. तेथेच थांबून सिगारेटही ओढले, पाणीही प्यायले. मात्र, जेव्हा दुकानमालकाने सिगारेटचे पैसे मागितले तेव्हा भांडण काढत धक्काबुक्की तसेच मारबडव केली. त्यात दुकानमालकाचा मृत्यू झाला असून, तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. बेळगाव तालुक्यातील बोडकेनट्टी येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. यल्लाप्पा दुर्गाप्पा नायक (वय 48, रा. बोडकेनट्टी) असे मृताचे नाव आहे.

काकती पोलिसांनी श्रीधर रतन पाटील (वय 26) निखील महेश चौगुले (वय 27) व विवेक राजेंद्र चौगुले (वय 22, तिघेही रा. कडोली) यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तिघे कडोलीचे असल्याची नोंद पोलिसांनी केली असली, तरी त्यातील दोघे बोडकेनट्टीचे तर एकजण कडोलीचा असल्याचे समजते.

काकती पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दड्डी मोहनगा येथील यात्रा असल्याने कडोली येथील चौघे तरुण यात्रेला गेले होते. यात्रेत मद्यपान व मांसाहार करून रात्रीच्यावेळी ते कडोलीला परतत होते. ते बोडकेनट्टी येथे आले, तेव्हा तेथे किराणा व चहाचे दुकान उघडे होते. दुकानमालक ते बंद करत असताना नेमक्या याचवेळी ते दुकानासमोर जाऊन सिगारेट मागू लागले. दुकानदार यल्लाप्पा यांनी पुन्हा दुकान उघडत चौघांना पाण्याची बाटली व सिगारेट दिले. चौघांनीही येथेच उभारून सिगारेट ओढले, तोपर्यंत दुकानदार यल्लाप्पाही तेथेच थांबले होते. जेव्हा त्यांचे धुम्रपान करून झाले तेव्हा त्यांनी सिगारेट व पाणी बाटलीचे पैसे मागितले. नशेत असलेल्या

चौघांपैकी तिघांनी आमच्याकडे पैसे मागतोस का, असे म्हणत यल्लाप्पा यांना जातीवाचक शिवीगाळ करत भांडण काढले. त्यानंतर तिघांनी त्यांना धक्काबुक्कीही केली. त्यांच्या छातीवर व पोटावर ठोसे लगावल्याने यल्लाप्पा अस्वस्थ बनले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात नेले. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने केएलई रूग्णालयात हलवण्यात येत असताना वाटेतच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर अर्ध्या तासात दुकान मालकाचा मृत्यू झाल्याचे समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. त्यानंतर त्यांनी हल्लेखोरांचे कडोली गाव गाठून तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणी मृताचा मोठा भाऊ निंगाप्पा दुर्गाप्पा नायक (वय 50, रा. बोडकेनट्टी) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास निरीक्षक शिंगे यांच्याकडून सुरू आहे.

चौघांवर खुनाचा गुन्हा

सिगारेटची तलफ झाल्याने चौघे तरुण धुम्रपानासाठी थांबले. परंतु, अंगात दारू भिनल्याने त्यांचा स्वतःवर ताबा नव्हता. दोन सिगारेट व पाण्याची बाटली घेतली. त्यानंतर बिल मागताच त्यांच्यातील दारू जागी झाली अन्‌‍ शिवीगाळ सुरू केली. यानंतर त्यांनी संबंधित दुकानमालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या 70 रुपयांसाठी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT