Crime News pudhari photo
बेळगाव

Belgaum Crime: केला घातपात, भासवला अपघात

रायबाग-चिकोडी मार्गावरील प्रकार : अनोळखीचा खून करुन मृतदेह रेल्वेरुळावर

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : अनोळखी तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याची घटना रायबाग-चिकोडी स्थानकादरम्यान उघडकीस आली आहे. रेल्वेतून पडल्याचे कोणतेही व्रण त्याच्या शरीरावर नसून डोकीत दगडाने वार केल्याचे रेल्वे पोलिसांना आढळून आले आहे. त्याला झोपवले होते त्या रुळावरुन रेल्वे न गेल्याने हा खून असल्याचे रेल्वे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे, या तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रायबाग-चिकोडी रेल्वे रुळादरम्यान ३० ते ३५ वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह रुळावर आढळून आला. तो बेळगावला उत्तरीय तपासणीसाठी आणल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावेळी त्याच्या अंगावर कुठेही रेल्वेतून पडल्याचे वा रेल्वेची धडक बसल्याचे व्रण नव्हते. त्याच्या डोकीवर दगड अथवा अन्य धारदार शस्त्राने वार केल्याचे मात्र व्रण दिसून आले. त्यामुळे, हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आला.

रेल्वे पोलिसांच्या म्हणण्यानुसार या तरुणाचा अन्यत्र खून करुन येथे रुळावर आणून मधोमध झोपवले आहे. हा सर्व प्रकार रविवारी रात्री अकराच्या सुमारास केलेला आहे. परंतु, यानंतर रात्रभर या रुळावर कोणतीही रेल्वे धावली नसल्याने तो तसाच पडून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी येथील एका कर्मचाऱ्याने रुळावरील हा मृतदेह पाहून याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली व हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याची नोंद करुन घेतली असून त्याचे ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. मंगळवारीही त्याची ओळख पटली नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT