Arrest Pudhari
बेळगाव

Belgaum murder case: खूनप्रकरणी अल्पवयीनासह चौघांना अटक

महिलेला त्रास दिल्याच्या कारणातून खून झाल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मुडलगीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह चौघांना ताब्यात घेतले आहे. परशुराम ऊर्फ परश्या बसवराज बंडीवड्डर (वय १९), नागराज ऊर्फ नाग्या शंकर बंडीवड्डर (वय २०), संजू ऊर्फ संजय श्याम निंबाळकर (वय २८ सर्व रा. दुर्गादेवीनगर, मुडलगी) अशी संशयितांची नावे आहेत. तसेच एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

थिमाण्णा विठ्ठल गाडीवड्डर (वय २१, रा. मुडलगी) या तरुणाचा २३ मे रोजी सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत मुडलगी शहरातील कळसण्णावर प्लॉट येथे धारदार शस्त्राने छातीत वार करुन खून करण्यात आला होता. याप्रकरणी लक्ष्मण बंडीवड्डर (वय ३०, रा. दुर्गादेवीनगर, मुडलगी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुडलगी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) व २३८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

प्राथमिक तपासात महिलेला त्रास दिल्याच्या कारणातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. संबंधित महिला संशयितांची नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. मयत थिमण्णा संबंधित महिलेला वारंवार त्रास देत असल्याचा संशय असून त्यातूनच संशयित आणि मयत यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादाचे रुपांतर पुढे हिंसक घटनेत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.

या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलिसप्रमुख रामगोंडा बसरगी, डीएसपी रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीशैल ब्याकुड, उपनिरीक्षक राजू पुजारी आणि पथकाने केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT