बेळगाव : महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्यावर खाऊकट्टा येथील गाळ्यांच्या वादातून अपात्रतेची कारवाई करण्यात आली. या कारवाईला दोघांनीही दोनवेळा स्थगिती आणली. या न्यायालयीन लढाईमुळे महापालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले नसले तरी काँग्रेस विरुध्द भाजप या वादात अधिकारी भरडले जात असून विकासकामांवर परिणाम होत आहे.
गोवावेस येथे सार्वजनिक बांधकाम खात्याने उभारलेल्या खाऊकट्टा येथे मंगेश पवार आणि जयंत जाधव यांनी गाळे घेतले. त्यानंतर ते नगरसेवक म्हणून निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी गाळे सोडायला पाहिजेत. गाळे बेकायदेशीरपणे घेतले आहेत, असा आरोप सुजित मुळगुंद आणि राजीव टोपण्णावर करत आले आहेत. या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले होते. प्रादेशिक आयुक्तांनी या प्रकरणी पवार आणि जाधव यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. त्याला नगरविकास खात्याकडे आव्हान देण्यात आले.
दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयाने प्रादेशिक आयुक्तांच्या कारवाईला स्थगिती दिली. त्यामुळे, त्यांना महापौर निवडणूक लढवण्याची मुभा दिली. या निवडणुकीत पवार महापौर झाले. पण, नगरविकास खात्याने दोघांच्या याचिका रद्द केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई कायम राहिली. पण, या कारवाईला उच्च न्यायालयाने पुन्हा स्थगिती दिल्याने राजकारणाला पुन्हा वेग आला आहे.
प्रादेशिक आयुक्त, नगरविकास खात्याचे सचिव हे सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे, त्यांच्यावर सरकारचा दबाव आहे, असा आरोप आमदार अभय पाटील करत आहेत. त्यामुळे, न्यायालयासमोर त्यांचे निकाल टिकणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे. उच्च न्यायालयात आता याचिका दाखल झाली असून अपात्रतेला अंतरिम स्थगिती दिली आहे. 6 जुलै रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे, न्यायालयीन घडामोडींवर महापालिकेचे राजकारण फिरणार आहे.
महापालिकेत भाजप आणि राज्यात काँग्रेस सत्तेवर आहे. महापालिकेत भाजपचे एकहाती वर्चस्व असल्यामुळे विरोधी गटाचा आवाज क्षीण झाला आहे. पण, पालकमंत्री, आमदार यांच्या माध्यमातून महापालिकेत वर्चस्व दाखवण्यात येत आहे. त्यामुळेच या दोन्हींच्या मध्ये अधिकार्यांचे सँडवीच झाले आहे. अधिकार्यांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सत्ताधार्यांचा दबाव आहे. त्यामुळे याचा कामकाजावर परिणाम दिसून येत आहे.