खानापूर : माकडाच्या हल्ल्यात पाच महिला जखमी झाल्याची घटना अल्लेहोळ (ता. खानापूर) येथे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.
सकाळच्या वेळी गल्लीत अंगण साफ करणे व पाणी भरण्याचे काम करणाऱ्या महिलांवर अचानक एका माकडाने हल्ला केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गावातील तरुणांनी एकत्र येत माकडाला हुसकावून लावले. माकडाच्या हल्ल्यात मलप्रभा निवृत्ती तोरगल (वय 60) या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या डोक्यात पाच टाके पडले आहेत. लक्ष्मी विलास तोरगल या महिलेचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तर माकडाला घाबरून पळताना आणखी दोन महिला रस्त्यावर पडून जखमी झाल्या. जखमी महिलांवर गावातच प्राथमिक उपचार झाल्यानंतर खानापूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.