बेळगाव : शिक्षकाचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर तपास करणाऱ्या पोलिसांना मोबाईल चोरट्यांची टोळीच सापडली असून, आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४० मोबाईल आणि दोन वाहने असा १० लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विकास भोवी, कुमार भोवी, प्रवीण भोवी, संतोष गविस्वामी कुंडा, शिवू भोवी, वेंकटेश भोवी, अक्षय ए. जी. ( सर्वजण रा. भद्रावती) आणि सचिन कल्लावड्डर (रा. गोकुळ रोड, हुबळी) अशी अटकेतील आठ जणांची नावे आहेत. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे ४ लाख ९४ हजाराचे ४० मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तसेच ५ लाख ४० हजार रुपये किमतीची दोन वाहने जप्त करण्यात आली आहे.
शिक्षक निळाप्पा सक्री (रा. बिजगुप्पी ता. रामदुर्ग) यांनी कटकोळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. २३ मेरोजी सालहळ्ळी गावातील आठवडी बाजारात त्यांचा २१ हजार रुपयांचा मोबाईल फोन चोरीला गेला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास चालवला असता टोळीच हाती लागली.
जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन , अतिरिक्त जिल्हा पोलिस आर. बी. बसरगी, रामदुर्ग उपविभागाचे डीवायएसपी चिदंबर मडिवाळ आणि रामदुर्गचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर यांच्या मार्गदर्शनाखाली कटकोळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. रवाईत कटकोळ पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जिल्हा तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.