Mobile Theft Pudhari
बेळगाव

Belgaum mobile theft: मोबाईल चोरट्यांची टोळी गजाआड

कटकोळ पोलिसांची कारवाई : आठ संशयित ताब्यात, ४० मोबाईलसह दोन कार जप्त

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : विविध आठवडी बाजारांमध्ये मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीचा कटकोळ पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणी भद्रावती व हुबळीतील आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे ४ लाख २४ हजार २०० रुपये किमतीचे ४० मोबाईल फोन तसेच चोरीसाठी वापरलेल्या दोन कार असा एकूण १० लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी गुरुवारी (दि. २८) पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, अटक केलेल्या संशयितांपैकी सातजण भद्रावती तालुक्यातील असून एकजण हुबळीचा रहिवासी आहे. संशयितांमध्ये विकास भोवी, कुमार भोवी, प्रवीण भोवी, संतोष कुंडा, शिवू भोवी, व्यंकटेश भोवी, अक्षय गणेश ए. जी. (सर्व रा. भद्रावती, जि. शिमोगा) व सचिन लक्ष्मण कल्लवड्डर (रा. गोकुळ रोड, हुबळी) यांचा समावेश आहे. रामदुर्ग डीवायएसपी चिदंबर मडिवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कटकोळ पोलिसांनी ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

आठवडी बाजारांच्या दिवशी मोठी गर्दी होत असल्याचा फायदा घेत ही टोळी बाजार परिसरात फिरत असे. खरेदीसाठी आलेल्या लोकांच्या खिशातील किंवा पर्समधील मोबाईल फोन चलाखीने चोरुन ते तातडीने दुसऱ्या ठिकाणी पसार होत असत. कटकोळ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका मोबाईल चोरीच्या फिर्यादीवरुन तपास सुरु करण्यात आला होता. तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान विविध गावांतील बाजारपेठांमधून चोरी केलेले तब्बल ४० मोबाईल जप्त करण्यात आले. ही टोळी चोरीनंतर सौंदत्तीतील यल्लम्मा डोंगर परिसरात मुक्काम करत असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. आणखी काही मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस निरीक्षक विनायक बडिगेर, उपनिरीक्षक बसवराज कोन्नूरे, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अन्नपूर्णा यल्ल, बी. व्ही. हुलकुंद, एस. एस. वज्रमट्टी, एम. सी. मण्णिकेरी, एस. एम. बसरीकट्टी, आर. बी. गोकाक, डी. एच. नदाफ, बी. एस. चुंचनूर, बी. एच. पाटील, एम. एम. द्यामणगौडर, एम. जी. हिरूर, जे. आर. गिड्डप्पण्णवर आणि के. टी. चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT