Minor driving 
बेळगाव

Minor driving: अल्पवयीन मुलाकडे दुचाकी; २५ हजारांचा दंड

रहदारी पोलिसांची कारवाई : अल्पवयीनांकडे वाहन न देण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : अल्पवयीन मुलगा वाहन चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची दखल घेऊन पोलिस खात्याने संबंधित मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल केला. त्याची दखल घेत न्यायालयाने सदर वाहनमालकाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

आजकाल लहान मुलांकडे दुचाकी देणे एक फॅशन बनत चालली आहे. आपला मुलगा लहान आहे. पण, दुचाकी व्यवस्थित चालवितो, असे सांगत अनेक पालक लहान मुलांकडे दुचाकी देतात. आधी गल्लीबोळात दुचाकी फिरवणारी ही अल्पवयीन मुले नंतर मुख्य रस्त्यावर येऊन भरधाव वाहने चालवताना दिसतात. असे चित्र शहरात सातत्याने दिसून येते. अनेक पालक तर आपल्या १५-१६ वर्षांच्या मुलाकडे कारही चालवायला दिल्याचे दिसून आले आहे. परंतु, रहदारी कायद्यानुसार हा गंभीर गुन्हा असल्याचे पोलिसांकडून वारंवार सांगूनही यामध्ये फरक पडताना दिसत नाही.

शहरातील एका रस्त्याने दहा-बारा वर्षाचा मुलगा वाहन चालवत जात होता. त्याच्या मागे बसलेला युवकही अल्पवनीयच आहे. याचा कुणीतरी व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. रहदारी पोलिसांनी याची दखल घेऊन सदर वाहन शोधून काढले. सदर मुलाच्या पालकाला अर्थात वाहनमालला नोटीस बजावली. या नोटीसीनुसार संबंधित पालकाला न्यायालयाने तब्बल २५ हजाराचा दंड ठोठावला.

पालकांनो सावधान

अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना शाळा व क्लासला जाण्यासाठी वाहन देतात. आपली कामे होतात म्हणून त्यांना वाहन देऊन स्वतःच पाठवतात. परंतु, ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यास मोठा दंड होऊ शकतो, अथवा एखादा अपघात घडल्यास संबंधित वाहनमालकाला शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे, पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, असे आवाहन पोलिस खात्याने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT