बेळगाव : मास्तमर्डीतील (ता. बेळगाव) बसव्वा दुंडाप्पा माविनकट्टी यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून संपूर्ण घर, दुचाकी आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पीडित कुटुंबाला मदत केली.
आमदार हेब्बाळकर यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कुटुंबीयांना धीर दिला. तसेच ‘लक्ष्मी ताई फाऊंडेशन’तर्फे कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत दिली. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलेल, असे आश्वासनही दिले. संकटात सापडलेल्या कुटुंबाला आधार देणे हे आपले कर्तव्य आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे बसव्वा यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे कुटुंबाने आपले घर आणि जीवनावश्यक वस्तू गमावल्या आहेत, त्यांना आवश्यक मदत देण्यासाठी पुढील पावले उचलली जातील, असे आमदार हेब्बाळकर यांनी सांगितले.