बेळगाव : अचानक तोल जाऊन पडल्याने गवंडी कामगाराचा मृत्यू झाल्याची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. शिवाप्पा शिवलिंगाप्पा कुरबर (वय ४५, मूळ रा. सुरपूर, जि. गुलबर्गा, सध्या रा. समर्थनगर, चौथा क्रॉस) असे मृताचे नाव आहे.
सदर गवंडी कामगार तेली पाटील गल्लीत गायकवाड नामक व्यक्तीच्या घराच्या कामावर होता. बुधवारी (दि. १४) दुपारी साडेतीनच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील काम सुरु होते. स्लॅबवर पडलेली वाळू व सिमेंट स्वच्छ करत असताना त्यांचा अचानक तोल गेल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली.
तातडीने जिल्हा रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृताची पत्नी श्रीमती लक्ष्मी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याची शहापूर पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक एस. एस. सीमानी पुढील तपास करीत आहेत.