बेळगाव : केंद्र सरकारने 1956 साली भाषावार प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी आणि मराठीबहुल सीमाभाग कर्नाटकात घातल्याच्या निषेधार्थ उसळलेल्या जनक्षोभात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 5 जणांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शनिवारी (दि. 17) सकाळी अभिवादन करण्यात येणार आहे. बेळगाव येथे हुतात्मा चौकात सकाळी 9.30 वाजता, कंग्राळी खुर्द येथे सकाळी 8.30 वाजता, खानापुरातील हुतात्मा चौकात सकाळी 8.30 वाजता आणि निपाणी येथे अभिवादन करण्यात येणार आहे.
हुतात्मा मारुती बेन्नाळकर, मधू बांदेकर, महादेव बारीगडी, लक्ष्मण गावडे, कमलाबाई मोहिते यांनी 17 जानेवारी 1956 या दिवशी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. सत्याग्रही बाळू निलजकर, नागाप्पा होसूरकर, गोपाळ अप्पू चौगुले यांचे तुरुंगात निधन झाले. 8 फेब्रुवारी 1969 रोजी 67 हुतात्मे शिवसेनेने दिले. 1 जून 1986 रोजी कन्नडसक्तीविरोधी आंदोलनात 9 हुतात्मे झाले. या साऱ्यांना सकाळी 9.30 वाजता हुतात्मा चौकात आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली आणि किर्लोस्कर रोडवर मूक फेरी निघणार आहे. त्यानंतर हुतात्मा चौकात अभिवादन सभा होणार आहे.
कंग्राळी खुर्द येथे तालुका म. ए. समितीतर्फे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 8.30 वा. हुतात्मा पै. मारुती बेन्नाळकर व बाळू निलजकर यांना अभिवादन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर मूक फेरी काढण्यात येणार आहे. खानापूर येथे सकाळी 8.30 वाजता हुतात्मा चौकात अभिवादन करण्यात येणार आहे. निपाणी येथेही हुतात्म्यांना सकाळी 10.30 वाजता अभिवादन करण्यात येणार आहे.
या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, शहर म. ए. समिती, खानापूर तालुका म. ए. समिती, निपाणी म. ए. समिती, शिवसेना (उबाठा), म. ए. युवा समिती, म. ए. युवा समिती सीमाभाग, महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.